नवी दिल्ली : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (IPL 2023) आज दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स (DV vs MI) यांच्यात सामना होणार आहे. दोन्हीही संघ आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात आहेत. म्हणून आज एक संघ विजयाचे खाते उघडेल हे स्पष्ट आहे. सायंकाळी ७.३० वाजल्यापासून नवी दिल्लीतील अरूण जेटली क्रिकेट स्टेडियमवर या सामन्याचा थरार रंगेल. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वातील दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला आपल्या सुरूवातीच्या तिन्ही सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. तर रोहितसेनेला देखील आरसीबी आणि सीएसकेने पराभवाची धूळ चारली आहे.
दरम्यान, डेव्हिड वॉर्नरचा स्ट्राईक रेट चर्चेचा विषय ठरत आहे. धिम्या गतीने धावा करणाऱ्या वॉर्नरवर वीरेंद्र सेहवागने निशाणा साधला होता. तर रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांचा खराब फॉर्म मुंबई इंडियन्सची डोकेदुखी वाढवत आहे. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत मुंबईच्या गोलंदाजीची धुरा जोफ्रा आर्चरच्या खांद्यावर आहे. पण तो सीएसकेविरूद्धच्या सामन्यात दुखापतीमुळे खेळला नव्हता. सलामीच्या सामन्यात देखील त्याला खास कामगिरी करता आली नाही. पण तो आजच्या सामन्यासाठी उपलब्ध असणार आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, प्रत्येकजण फिट आणि उपलब्ध असल्याचे कॅमेरून ग्रीनने सांगितले आहे.
तसेच दिल्ली कॅपिटल्सचे सहाय्यक प्रशिक्षक प्रविण अमरे यांनी सांगितले की, खलील अहमद कदाचित मुंबई इंडियन्सविरूद्धच्या सामन्यात खेळणार नाही. राजस्थान रॉयल्सविरूद्ध खेळताना त्याच्या हाताला दुखापत झाली होती. पण त्याच्या रिपोर्टची आम्ही वाट पाहत असून त्याच्या जागी चेतन साकारियाला खेळवण्याचा आमचा विचार असल्याचे अमरे यांनी स्पष्ट केले. लक्षणीय बाब म्हणजे आजच्या सामन्यातून दिल्लीचा फिल सॅल्ट आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची दाट शक्यता आहे.
आजच्या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सचा संभावित संघ - रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, ऋतिक शौकिन, जोफ्रा आर्चर, पियुष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, संदिप वॉरियर. इम्पॅक्ट प्लेयर - कुमार कार्तिकिया
आजच्या सामन्यासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संभावित संघ - डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), पृथ्वी शॉ, मनिष पांडे, रिले रोसो, फिल सॅल्ट, अक्षर पटेल, ललित यादव, अभिषेक पोरल, ॲनरिक नॉर्तजे, कुलदीप यादव, मुकेश कुमार, चेतन साकारिया. इम्पॅक्ट प्लेयर - अमन खान
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"