kedar jadhav ipl । मुंबई : भारतीय संघाचा खेळाडू केदार जाधव मागील काही कालावधीपासून क्रिकेटच्या 'मैदाना'पासून दूर आहे. होय, पुण्याचा भिडू केवळ क्रिकेटच्या मैदानातून दूर आहे, पण तो आयपीएलमध्ये जिओ सिनेमावर समालोचनाच्या माध्यमातून आपल्या मराठीला बळ देण्याचा प्रयत्न करत आहे. मला माझ्या भाषेचा अभिमान आहे आणि म्हणूनच मी मराठी समालोचनाकडे वळलो असल्याचे त्याने म्हटले आहे. याशिवाय ज्याला मराठी कळते, समजते त्याने नक्कीच मराठीतील समालोचन ऐकावे असे खास आवाहन त्याने मराठी प्रेक्षकांना केले आहे. तो जिओ सिनेमाच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रातील माध्यमांशी बोलत होता.
दरम्यान, केदार जाधवने चेन्नई सुपर किंग्जच्या आठवणींना उजाळा देताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले. आयुष्यात चढ-उतार येत असतो, सीएसकेसोबत खूप आठवणी आहेत. कदाचित पुढच्या वर्षी आयपीएलमध्ये खेळेन असेही त्याने यावेळी म्हटले. तसेच मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडला विश्वचषकानंतर भारतीय संघात संधी मिळायला हवी. यंदाच्या हंगामात स्पर्धा मोठी असली तरी गुजरात टायटन्सचा संघ पुन्हा एकदा किताब जिंकेल असा दावा केदारने केला आहे.
ऋतुराज कर्णधारपद सांभाळण्यासाठी सक्षम - केदार
महेंद्रसिंग धोनीनंतर चेन्नईचे कर्णधारपद कोण सांभाळणार असे विचारले असता त्याने म्हटले, "धोनीशिवाय आयपीएल पाहणे हे सीएसकेशिवाय इतरही संघाच्या चाहत्यांना आवडणार नाही. पण धोनीचे हे आयपीएलमधील अखेरचे वर्ष असेल. कारण त्याचे वय आता ४२ वर्षे आहे. धोनीनंतर संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळण्यासाठी ऋतुराज गायकवाड सक्षम आहे. या यादीत बेन स्टोक्स देखील आहे पण गायकवाड हा कर्णधारपदाचा प्रमुख दावेदार असेल."
"धोनी ५ मिनिटांत कोणाचंही मन जिंकतो"
धोनीच्या नेतृत्वाखाली मला खेळण्याची संधी मिळाली. धोनीने मला सांभाळून घेतले आणि पुढे जाण्याची प्रेरणा दिली. धोनीने संघात पोषक वातावरण करून मला संधी दिली. खरं तर धोनी सगळ्यांनाच संधी देतो. धोनीला कोणताही खेळाडू ५ मिनिटे जरी भेटला तरी माही भाई त्या खेळाडूच्या मनात जागा करतो अन् त्याला आपलंस करतो. धोनीने माझा खराब फॉर्म असतानाही सावरून घेतले हेच त्याचे वैशिष्ट्ये आहे. एखादा खेळाडू खराब गोलंदाजी किंवा फलंदाजी करत असेल तर धोनी त्याची आपुलकीने विचारपूस करतो शिवाय आणखी संधी देखील देतो, असे केदारने धोनीबद्दलच्या आठवणी सांगताना म्हटले.
मराठी माणूस पुढे गेल्यावर अभिमान वाटतो - जाधव
यंदाच्या आयपीएल हंगामात मराठमोळे शिलेदार चमकदार कामगिरी करत आहेत. यामध्ये ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे आणि तुषार देशपांडे अशा काही खेळाडूंचा समावेश आहे. याबाबत केदारला विचारले असता त्याने म्हटले, "मला मराठीतून समालोचन करताना मजा येते. मुंबई विरूद्ध चेन्नई हा माझा सर्वात आवडता सामना आहे. मुंबईविरूद्धच्या सामन्यात किंवा इतर कोणत्याही संघाविरूद्ध मराठी खेळाडूंनी चांगली खेळी केली की मला अभिमान वाटतो. तसेच चेन्नईच्या संघाचा मराठी खेळाडूंवर नेहमीच जीव राहिला आहे. मराठी माणूस पोटासाठी किती लांब गेला तरी आपली भाषा ऐकल्यावर आपुलकीने जवळ येतो यात खूप प्रेम आहे."
केदार जाधव, आयपीएल समालोचक आणि एक्स्पर्ट Jio Cinema
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: In IPL 2023, Kedar Jadhav, who is commentating in Marathi on Jio Cinemas, has commented on the team of Chennai Super Kings, he also said that Rituraj Gaikwad will become the captain of CSK after Mahendra Singh Dhoni
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.