Join us  

लखनौने सामना जिंकला पण BCCIने राहुलला मोठा धक्का दिला; ठोठावला १२ लाखांचा दंड

KL Rahul fined 12 Lakhs : सध्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 1:23 PM

Open in App

IPL 2023 । जयपूर : आयपीएलमध्ये काल झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सनेराजस्थान रॉयल्सचा १० धावांनी पराभव केला. लखनौचा विजय झाला असला तरी लोकेश राहुलच्या संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे. खरं तर कर्णधार राहुलवर धिम्या खेळीमुळे टीका केली जात आहे. त्याने काल ३२ चेंडूत ३९ धावांची साजेशी खेळी केली. पण पॉवरप्लेमध्ये एवढी रटाळ फलंदाजी मी आतापर्यंत कधीच पाहिली नव्हती अशा शब्दांत केव्हिन पीटरसनने राहुलवर निशाणा साधला आहे. अशातच आता बीसीसीआयने देखील राहुलला एक मोठा झटका दिला आहे.

दरम्यान, वेळेत षटके न टाकल्यामुळे लखनौच्या संघाला दंड आकारला गेला आहे. त्यामुळे कर्णधार लोकेश राहुलला नियमानुसार १२ लाख रूपये भरावे लागणार आहेत. आयपीएलच्या आचार संहितेनुसार त्याची या हंगामातील ही पहिलीच चूक आहे. त्यामुळे त्याला १२ लाख रूपये मोजावे लागणार आहेत. 

काल नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना लखनौच्या संघाने निर्धारित २० षटकांत ७ बाद १५४ धावा केल्या होत्या. कर्णधार लोकेश राहुल (३९) आणि काइल मेयर्स (५१) यांच्या खेळीच्या जोरावर लखनौने राजस्थानसमोर १५५ धावांचे सन्मानजनक लक्ष्य ठेवले. १५५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना यजमान राजस्थानने शानदार सुरूवात केली. सलामीवीर यशस्वी जैस्वाल (४४) आणि जोस बटलर (४०) यांनी चांगली सुरूवात करून दिली. पण अखेरच्या काही षटकांमध्ये लखनौच्या गोलंदाजांनी कमाल केली. अखेर राजस्थानने २० षटकांत ६ बाद केवळ १४४ धावा केल्या आणि संघाला १० धावांनी पराभव पत्करावा लागला. लक्षणीय बाब म्हणजे राजस्थान रॉयल्सच्या पराभवाला रियान परागची धिमी खेळी जबाबदार असल्याचे अनेक जाणकार म्हणत आहेत.

लखनौचा १० धावांनी विजय रियान पराग सोळाव्या षटकात फलंदाजीसाठी आला. त्यावेळी संघाला विजयासाठी ५१ धावांची आवश्यकता होती. रियान पराग सामना राजस्थानच्या नावावर करेल अशी सर्वांना अपेक्षा होती. पण त्याने १२ चेंडूत केवळ १५ धावा केल्या. म्हणजेच रियानने १० चेंडूत फक्त ५ धावा केल्या. अखेर लखनौ सुपर जायंट्सच्या संघाने १० धावांनी सामना आपल्या नावावर केला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :आयपीएल २०२३लोकेश राहुलबीसीसीआयलखनौ सुपर जायंट्सराजस्थान रॉयल्स
Open in App