sachin tendulkar ipl । बंगळुरू : आयपीएलमध्ये (IPL 2023) काल झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने अखरेच्या चेंडूवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (LSG vs RCB) पराभव केला. आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना शानदार सुरूवात केली. विराट कोहली, फाफ डू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल या त्रिरत्नांनी अर्धशतकी खेळी करून पाहुण्या लखनौच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. आरसीबीने निर्धारित २० षटकांत २ बाद २१२ धावा केल्या. पण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ही धावसंख्या पुरेशी नसल्याचा दावा केला होता. २०० पार धावा असतानाही आरसीबीचा पराभव झाल्यानंतर सचिनचे ते ट्विट व्हायरल होत आहे.
सचिनने ट्विटच्या माध्यमातून म्हटले, "विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस या सलामीवीरांना ग्लेन मॅक्सवेलसाठी बरोबर प्लॅटफॉर्म सेट केले, जेणेकरून मॅक्सवेलच्या मदतीने संघ एक मोठी धावसंख्या करू शकेल. पण या मैदानाचा आकार पाहता २१० ही धावसंख्या पुरेशी नाही." एकूणच सचिनने चिन्नस्वामी स्टेडियमवर २१० ही धावसंख्या कमी असल्याचे म्हटले आहे. आरसीबीकडून विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस या जोडीने पहिल्या बळीसाठी ९६ धावांची भागीदारी नोंदवली होती.
अखेरच्या चेंडूवर लखनौचा विजय काल झालेल्या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत २ बाद २१२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात लखनौने ९ गडी गमावून २१३ धावा करून विजय साकारला. अखेरच्या चेंडूवर एक धाव काढून आवेश खानने संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह लखनौने ६ गुणांसह क्रमवारीत अव्वल स्थान गाठले.
या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून विराट कोहलीने ४४ चेंडूत ६१, ग्लेन मॅक्सवेलने २९ चेंडूत ५९ धावा आणि कर्णधार फाफ डू प्लेसिसने ४६ चेंडूत नाबाद ७९ धावांची खेळी केली. तर लखनौकडून मार्क स्टॉयनिस आणि निकोलस पूरन यांनी स्फोटक खेळी करून आरसीबीचा पराभव करण्यात मोलाची भूमिका बजावली. स्टॉयनिसने ३० चेंडूत ६५ आणि निकोलस पूरनने १९ चेंडूत ६२ धावांची मोठी खेळी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"