Join us  

"मी नेहमी संघासाठी खेळतो...", मुंबईविरूद्ध शतक झळकावल्यानंतर अय्यरची प्रतिक्रिया

IPL 2023 : मुंबई इंडियन्सने आपल्या घरच्या मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव करून स्पर्धेत दुसरा विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 8:05 PM

Open in App

MI vs KKR, Venkatesh Iyer । मुंबई : मुंबई इंडियन्सने आपल्या घरच्या मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव करून स्पर्धेत दुसरा विजय मिळवला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात यजमान मुंबईच्या संघाने सांघिक खेळी करून विजय साकारला. प्रथम फलंदाजी करताना केकेआरने निर्धारित २० षटकांत ६ बाद १८५ धावा केल्या. पाहुण्या संघाकडून व्यंकटेश अय्यरने ५१ चेंडूत १०४ धावांची शतकी खेळी केली. ९ षटकार आणि ६ चौकार ठोकून अय्यरने मुंबईसमोर १८६ धावांचे तगडे आव्हान ठेवले.

दरम्यान, केकेआरकडून अय्यर व्यतिरिक्त एकाही फलंदाजाला साजेशी खेळी करता आली नाही. अय्यरने शतक झळकावले पण तो त्याच्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. शतकी खेळीनंतर व्यंकटेश अय्यरने ब्रॉडकास्टर्सशी बोलताना म्हटले, "या क्षणाला खूप आनंद होत आहे. मुंबईत येऊन ही खेळी करणे साहजिकच मोठी गोष्ट आहे. पण संघाबद्दल बोलायचे झाले तर, आता काम अर्धे झाले आहे (पहिला डाव संपल्यानंतर). मला खात्री आहे की आम्ही एकूण बचाव करू, मी एक गोष्ट सांगू शकतो की जेव्हा मी मैदानात उतरतो तेव्हा मी फक्त माझ्या संघासाठी खेळतो. वेगवान गोलंदाजांचे धिम्या गतीने येणारे चेंडू खूप महत्त्वाचे असतात. त्यानंतर फिरकीपटूंची देखील महत्त्वाची भूमिका पाहायला मिळते. आमच्याकडे फिरकीपटूंचे उत्तम त्रिकूट आहे."

मुंबईचा मोठा विजय खरं तर पहिला डाव संपल्यानंतर अय्यरने आम्ही धावांचा बचाव करू असे म्हटले होते. पण मुंबई इंडियन्सच्या संघाने सांघिक खेळी करून विजय साकारला. नियमित कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादवने कर्णधारपद सांभाळले. इम्पॅक्ट प्लेयरच्या रूपात रोहित शर्माचे खेळपट्टीवर आगमन झाले अन् त्याने १३ चेंडूत २० धावांची छोटी खेळी केली. सुयश वर्माने हिटमॅनला बाद करून यजमान संघाला पहिला धक्का दिला. त्यानंतर इशान किशनने शानदार अर्धशतक झळकावताना २५ चेंडूत ५८ धावांची खेळी केली. याशिवाय कर्णधार सूर्यकुमार यादव (४३) आणि तिलक वर्मा (३०) यांनी संघाच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले. अखेरच्या काही षटकांमध्ये टीम डेव्हिडने १३ चेंडूत २४ धावा करून मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. मुंबईने १७.४ षटकांत ५ बाद १८६ धावा करून मोठा विजय मिळवला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :आयपीएल २०२३मुंबई इंडियन्सकोलकाता नाईट रायडर्सवेंकटेश अय्यरसूर्यकुमार अशोक यादव
Open in App