केवळ तीन दिवसात भारताने लंकेला नमवले; पहिल्या कसोटीत एक डाव आणि २२२ धावांनी दणदणीत विजय

तिसऱ्या दिवसाची ४ बाद १०८ धावांवरून सुरुवात केलेल्या लंकेचा पहिला डाव रविवारी केवल ७० धावांत संपुष्टात आला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 05:24 AM2022-03-07T05:24:26+5:302022-03-07T05:24:50+5:30

whatsapp join usJoin us
In just three days, India defeated Sri Lanka; In the first Test, won by an innings and 222 runs | केवळ तीन दिवसात भारताने लंकेला नमवले; पहिल्या कसोटीत एक डाव आणि २२२ धावांनी दणदणीत विजय

केवळ तीन दिवसात भारताने लंकेला नमवले; पहिल्या कसोटीत एक डाव आणि २२२ धावांनी दणदणीत विजय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मोहाली : रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांच्या निर्णायक अष्टपैलू खेळीच्या जोरावर भारताने एकतर्फी रंगलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा एक डाव आणि २२२ धावा राखून धुव्वा उडवला. भारताने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात ८ बाद ५७४ धावा उभारल्या. यानंतर श्रीलंकेला १७४ धावांत गुंडाळून ४०० धावांची भक्कम आघाडी घेतली. लंकेला फॉलोऑन देत त्यांचा दुसरा डाव १७८ धावांत संपुष्टात आणत भारतीयांनी तिसऱ्याच दिवशी सामना जिंकला.

तिसऱ्या दिवसाची ४ बाद १०८ धावांवरून सुरुवात केलेल्या लंकेचा पहिला डाव रविवारी केवल ७० धावांत संपुष्टात आला. भारताच्या पहिल्या डावात नाबाद १७५ धावांची तुफानी खेळी केलेल्या जडेजाने ४१ धावांत ५ बळी घेत लंकेच्या फलंदाजीला खिंडार पाडले. जसप्रीत बुमराह आणि रविचंद्रन अश्विन यांनीही प्रत्येकी २ बळी घेत जडेजाला चांगली साथ दिली. पथुम निसांकाने १३३ चेंडूंत ११ चौकारांसह नाबाद ६१ धावांची खेळी करत एकाकी झुंज दिली.
फॉलोऑनच्या नामुष्कीला सामोरे जावे लागल्यानंतर पुन्हा एकदा लंकेचा डाव गडगडला. पुन्हा एकदा जडेजा आणि अश्विन यांच्या फिरकीच्या तालावर नाचलेल्या लंकेचा डाव केवळ १७८ धावांत गुंडाळला गेला. जडेजाने ४६ धावांत ४ बळी घेतले. अश्विनने ४७ धावांत ४ बळी घेत लंकेचे मानसिक खच्चीकरण केले. यावेळी अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये कपिल देव यांचा ४३४ बळी घेण्याचा विक्रमही मोडला. मोहम्मद शमीनेही २ बळी घेत लंकेच्या उरल्यासुरल्या आशा संपुष्टात आणल्या. दुसऱ्या डावात निरोशन डिकवेलाने अपयशी लढत देताना ८१ चेंडूंत ९ चौकारांसह नाबाद ५१ धावा फटकावल्या. प्रमुख फलंदाजांचे अपयश लंकेला महागात पडले.


भारत (पहिला डाव) : १२९.२ षटकांत ८ बाद ५७४ धावा (घोषित)
श्रीलंका (पहिला डाव) : ६५ षटकांत सर्वबाद १७४ धावा.
श्रीलंका (दुसरा डाव) : लाहिरु थिरिमाने झे. रोहित गो. अश्विन ०, दिमुथ करुणारत्ने झे. पंत गो. शमी २७, पथुम निसांका झे. पंत गो. अश्विन ६, अँजेलो मॅथ्यूज पायचीत गो. जडेजा २८, धनंजय डीसिल्वा झे. अय्यर गो. जडेजा ३०, चरिथ असलंका झे. कोहली गो. अश्विन २०, निरोशन डिकवेला नाबाद ५१, सुरंगा लकमल झे. यादव गो. जडेजा ०, लसिथ एम्बुलडेनिया झे. पंत गो. जडेजा २, विश्वा फर्नांडो पायचीत गो. शमी ०, लाहिरु कुमारा झे. शमी गो. अश्विन ४. अवांतर - १०. एकूण : ६० षटकांत सर्वबाद १७८ धावा. बाद क्रम : १-९, २-१९, ३-४५, ४-९४, ५-१२१, ६-१२१, ७-१२१, ८-१५३, ९-१७०, १०-१७८. गोलंदाजी : रविचंद्रन अश्विन २१-५-४७-४; मोहम्मद शमी ८-१-४८-२; रवींद्र जडेजा १६-५-४६-४; जयंत यादव ११-३-२१-०; जसप्रीत बुमराह ४-१-७-०.

अश्विनचा 
विक्रमी मारा!
रविचंद्रन अश्विनने या सामन्यात दोन्ही डावांत मिळून ६ बळी घेताना कसोटी क्रिकेटमध्ये ४३६ बळी पूर्ण केले. यासह त्याने दिग्गज कपिल देव यांचा ४३४ बळींचा विक्रम मोडला. अश्विन आता कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा भारतीय गोलंदाज बनला असून त्याच्यापुढे केवळ अनिल कुंबळे (६१९) आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्यांमध्ये रविचंद्रन अश्विन चौथा फिरकीपटू आणि एकूण नववा गोलंदाज ठरला. मुथय्या मुरलीधरन (८००), शेन वॉर्न (७०८) आणि अनिल कुंबळे (६१९) अव्वल तीन स्थानावरील फिरकीपटू.

n श्रीलंकेने दुसऱ्यांदा एकाच दिवशी १६ बळी गमावले. याआधी २०१७ मध्ये जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध लंकेची अशी घसरगुंडी उडाली होती.
n रवींद्र जडेजाने एकाच दिवशी सुरंगला लकमलला दोनवेळा बाद केले. एकाच फलंदाजाला एकाच दिवशी दोनवेळा बाद करणारा क्रिकेटविश्वातील तो सातवा गोलंदाज ठरला.
n मोहाली येथे सलग तिसऱ्या कसोटीत जडेजा सामनावीर ठरला. याआधी दक्षिण आफ्रिका (२००५) आणि इंग्लंडविरुद्ध (२०१६) तो सामनावीर ठरला होता.
n भारताने श्रीलंकेविरुद्ध २१वा कसोटी विजय मिळवला.
n रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने तिन्ही प्रकारात मिळून सलग १६वा विजय मिळवला.

Web Title: In just three days, India defeated Sri Lanka; In the first Test, won by an innings and 222 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.