ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ च्या विजयात भारताचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवचा मोठा हात आहे. सामन्याच्या अखेरीस दबावाच्या स्थितीत सूर्याने डेव्हिड मिलरचा अप्रतिम झेल घेऊन तमाम भारतीयांना सुखद धक्का दिला. वेस्ट इंडिजच्या धरतीवर झालेल्या या सामन्यात भारताने निसटता विजय मिळवून भारतीयांना जल्लोष करण्याची संधी दिली. अखेरच्या षटकांत दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी १६ धावांची आवश्यकता होती. हार्दिक पांड्याच्या या षटकातील पहिल्याच चेंडूवर मिलरने मोठा फटका मारला. पण, सीमारेषेजवळ उभा असलेल्या सूर्याने मोक्याच्या क्षणी भारी झेल घेऊन आफ्रिकेला मोठा झटका दिला. मग भारताने विश्वचषक उंचावला.
सूर्याने अंतिम सामन्यात घेतलेला झेल आजतागायत भारतीयांच्या मनात ताजा आहे. बार्बाडोसवरुन टीम इंडिया भारतात परतल्यानंतर त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर क्रिकेटची पंढरी अर्थात मुंबईत चाहत्यांनी मोठी गर्दी केली. आपल्या लाडक्या खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी चाहते लाखोच्या संख्येने एकवटले. आता विश्वविजेत्या संघातील शिलेदार प्रसिद्ध अशा कपिल शर्मा शोमध्ये पोहोचले. यावेळी भारतीय कर्णधार रोहित शर्मा, अर्शदीप सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, शिवम दुबे आणि सूर्यकुमार यादव यांनी भन्नाट किस्से सांगून उपस्थितांचे मनोरंजन केले.
दरम्यान, विश्वचषक जिंकल्यानंतर सूर्या आणि त्याची पत्नी देविशा शेट्टी यांनी विश्वचषकाच्या ट्रॉफीसोबत फोटो शेअर केले होते. यामध्ये हे जोडपे झोपलेल्या अवस्थेत असल्याचे दिसते आणि ट्रॉफी त्यांच्या मध्यभागी असते. यावरुन कपिल शर्माने सूर्याला एक मिश्किल प्रश्न विचारत त्याची फिरकी घेतली.
"विश्वचषकाची ट्रॉफी मधोमध ठेवून नवरा-बायको झोपलेले दिसत आहेत... सूर्या तुझ्या घरच्यांनी असे सांगितले नाही का की, ही ट्रॉफी दोन दिवसांनी बीसीसीआयच्या ऑफिसमध्ये जाईल. मग तुम्ही दोघे मिळून एक पर्मनंट ट्रॉफी आणा जी नेहमी सोबत असेल", कपिल शर्माच्या या प्रश्नावर सूर्याने सांगितले की, ही ट्रॉफी आली आता ती देखील ट्रॉफी लवकरच येईल. सूर्याच्या या उत्तरानंतर त्याची पत्नी देविशा शेट्टीला एकच हशा पिकला.
Web Title: In Kapil Sharma Show, Suryakumar Yadav said that permanent trophy will come soon
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.