legends league cricket 2023 । नवी दिल्ली : लीजेंड्स लीग क्रिकेटमध्ये गौतम गंभीरच्या नेतृत्वातील इंडिया महाराजाच्या संघाने आशिया लायन्सचा पराभव करून विजयाचे खाते उघडले आहे. लीजेंड्स लीग क्रिकेटच्या चौथ्या सामन्यात इंडिया महाराजाने शाहिद आफ्रिदीच्या आशिया लायन्स संघाचा 10 गडी राखून दारूण पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना आशिया लायन्सने 5 गडी गमावत 157 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंडिया महाराजाने 13व्या षटकात एकही गडी न गमावता 159 धावा करून सामना आपल्या नावावर केला. लक्षणीय बाब म्हणजे कर्णधार गौतम गंभीरने सलग तिसऱ्यांदा अर्धशतक झळकावले.
दरम्यान, इंडिया महाराजाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना आशिया लायन्सकडून चांगली सुरुवात झाली. उपुल थरंगा आणि तिलकरत्ने दिलशान यांनी पहिल्या बळीसाठी 73 धावांची भागीदारी नोंदवली. श्रीलंकेचा दिग्गज दिलशान (32) धावांची वैयक्तिक खेळी करून बाद झाला. तर हाफीज (2) आणि मिस्बाह उलहकला खाते देखील उघडता आले नाही. पण उपुल थरंगाने शानदार अर्धशतक झळकावले. त्याने 48 चेंडूत 69 धावांची शानदार खेळी केली. असगर अफगाणने 15 आणि अब्दुल रझाकने नाबाद 27 धावा करून धावसंख्या 150 पार पोहचवली. अखेर आशिया लायन्सच्या संघाने 20 षटकांत 5 बाद 157 धावा केल्या. इंडिया महाराजाकडून सुरेश रैनाने शानदार गोलंदाजी करत सर्वाधिक 2 बळी घेतले.
इंडिया महाराजाचा पहिला विजय 158 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंडिया महाराजाने चमकदार सुरूवात केली. संघाचा कर्णधार आणि सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर आणि रॉबिन उथप्पा यांनी आशिया लायन्सच्या गोलंदाजांना घाम फोडला. दोघांनीही नाबाद अर्धशतके झळकावली. गौतम गंभीरने लीगमधील सलग तिसरे अर्धशतक झळकावले. तो 36 चेंडूत 61 धावा करून नाबाद परतला. तर उथप्पाने 39 चेंडूत नाबाद 88 धावांची खेळी करून इंडिया महाराजाला 10 गडी राखून विजय मिळवून दिला. लीगमधील सलग दोन पराभवानंतर इंडिया महाराजाचा हा पहिला विजय आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"