Legends League Cricket । नवी दिल्ली : सध्या लीजेंड्स लीग क्रिकेटचा थरार रंगला आहे. भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज श्रीसंतने पुन्हा एकदा रौद्ररूप दाखवून जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्विंग आणि आपल्या गतीमुळे दिग्गज फलंदाजांना गारद करणारा श्रीसंत पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. खरं तर श्रीसंत हा त्याच्या रागीट स्वभावामुळे प्रसिद्ध आहे. अनेकवेळा वादात राहिलेल्या श्रीसंतने लीजेंड्स लीग क्रिकेट 2022 मध्ये एक शानदार चेंडू टाकला, ज्यामुळे स्टंम्प 4 मीटर दूर फेकला गेला.
दरम्यान, श्रीसंतने श्रीलंकेचा दिग्गज तिलकरत्ने दिलशानचा त्रिफळा उडवल्याचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. गुजरात जायंट्स आणि भिलवाडा किंग्ज यांच्यातील दुसऱ्या क्वालिफायरमध्ये श्रीसंतने तिलकरत्ने दिलशानला क्लीन बोल्ड करून त्याला बाद केले. श्रीसंतने तिलकरत्ने दिलशानला लेन्थ बॉलवर बाद केले. दिलशान एक आक्रमक फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता. पण तो चेंडू खेळण्यात पूर्णपणे चुकला.
दिलशान 26 चेंडूत पाच चौकार आणि एक षटकार मारून बाद झाला. याशिवाय अठराव्या षटकांत श्रीसंतने स्टुअर्ट बिन्नीला देखील बाद केले. आपल्या 4 षटकांत श्रीसंतने 28 धावा देऊन 2 बळी पटकावले. लक्षणीय बाब म्हणजे आयपीएलमधील फिक्सिंगच्या आरोपांमुळे श्रीसंतच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर मोठा परिणाम झाला होता.
स्पॉट फिक्सिंगमुळे चर्चेत आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्याच्यावर स्पॉट फिक्सिंगचे आरोप झाले होते, त्यानंतर श्रीसंतला कधीच आयपीएल किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करता आले नाही. श्रीसंत 2007 च्या टी-20 विश्वचषक आणि 2011 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा हिस्सा होता.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"