MLC 2024 : ट्वेंटी-२० विश्वचषकात विराट कोहलीने पाकिस्तानच्या हारिस रौफला मोक्याच्या क्षणी सलग दोन षटकार मारले अन् पाकिस्तानी गोलंदाज प्रसिद्धीच्या झोतात आला. वेगवान गोलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या रौफची आता सर्वत्र धुलाई होत असल्याचे दिसते. तेव्हाच्या विश्वचषकानंतर, आशिया चषक, वन डे विश्वचषक २०२३ आणि ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ मध्येही हारिसची बेक्कार धुलाई झाली. सध्या मेजर लीग क्रिकेटचा थरार रंगला आहे. विविध देशातील नामांकित खेळाडू या लीगमध्ये खेळत आहेत. पाकिस्तानचा हारिस रौफही या स्पर्धेचा भाग आहे.
मागील काही कालावधीपासून संघर्ष करत असलेल्या हारिसचा हा संघर्ष कायम आहे. अमेरिकेत होत असलेल्या मेजर लीग क्रिकेटमध्ये हारिस रौफची शेहन जयसूर्याने चांगलीच धुलाई केली. काही अविश्वसनीय फटके मारून जयसूर्याने चांगलाच समाचार घेतला. खरे तर जयसूर्याची फलंदाजी पाहून हारिसने सूचक हावभाव केले. san francisco unicorns vs seattle orcas या सामन्यात जयसूर्याच्या सेटल ऑर्कस संघाने २३ धावांनी सामना गमावला. पण, जयसूर्याने केलेली खेळी सर्वांचे लक्ष वेधून गेली. हारिस रौफने त्याच्या निर्धारित ४ षटकांत ३० धावा दिल्या.
शेहान जयसूर्याने २ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने ३७ चेंडूत ५४ धावांची अप्रतिम खेळी केली. पण, तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. शेहन जयसूर्याने हारिस रौफची केलेली धुलाई आणि पाकिस्तानी गोलंदाजाचा पडलेला चेहरा पाहून चाहते त्याची फिरकी घेत आहे. अनेकांनी या व्हिडीओचा दाखला देत हारिसची खिल्ली उडवली.