IND vs NZ : सलग नऊ सामने जिंकल्यानंतर यजमान भारतीय संघ उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडशी भिडणार आहे. बुधवारी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर फायनलच्या तिकिटासाठी लढत होणार आहे. खरं तर २०१९ च्या विश्वचषकात देखील उपांत्य फेरीच्या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड आमनेसामने होते. पण त्यावेळी किवी संघाने तमाम भारतीयांच्या स्वप्नावर पाणी टाकत फायनलमध्ये प्रवेश मिळवला. मात्र, यंदाच्या विश्वचषकात भारतीय संघाची चमकदार कामगिरी राहिली असून प्रथमच टीम इंडिया अपराजित राहिली आहे.
अपराजित राहिलेल्या भारतीय संघाला रोखण्याचे मोठे आव्हान किवी संघासमोर असेल. त्यामुळे न्यूझीलंडविरूद्धच्या मोठ्या सामन्यासाठी भारतीय संघात बदल होण्याची शक्यता फारच कमी आहे. पण, न्यूझीलंडच्या संघात डावखुऱ्या फलंदाजांची संख्या अधिक असल्याने रविचंद्रन अश्विनला संघात स्थान दिले जाऊ शकते. सूर्यकुमार यादवच्या जागी अश्विनला खेळवले जाण्याची शक्यता आहे. 'सूर्या'ने आतापर्यंत साजेशी खेळी करून संघाच्या विजयात योगदान दिले आहे. मात्र, कर्णधार रोहित शर्माला गोलंदाजीसाठी सहावा पर्याय म्हणून अश्विनला संधी मिळते का हे पाहण्याजोगे असणार आहे. हार्दिक पांड्याच्या दुखापतीनंतर टीम इंडिया पाच गोलंदाजांसह उतरली आहे. पण महत्त्वाच्या सामन्यासाठी अश्विनला सहावा गोलंदाज म्हणून संघात स्थान मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. 'सूर्या'च्या तुलनेत अश्विनला मोठ्या व्यासपीठावर खेळण्याचा अनुभव देखील अधिक असल्याने ही अश्विनची जमेची बाजू आहे.
न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यासाठी भारताचा संभाव्य संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, रवींद्र जडेजा, सूर्यकुमार यादव/रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.
भारताची ऐतिहासिक कामगिरी
भारतीय संघाने विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच साखळी फेरीतील सर्व सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. आपल्या अखेरच्या सामन्यात नेदरलँड्सविरूद्ध प्रथम फलंदाजी करताना भारताने ४ गडी गमावून ४१० धावांची विशाल धावसंख्या उभारली. श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुल यांनी शतकी खेळी करून भारताच्या नवव्या विजयात मोलाची भूमिका बजावली. अय्यरने नाबाद १२८ धावा केल्या तर राहुलने १०२ धावांचे योगदान दिले. ४११ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नेदरलँड्सचा संघ २५० धावांत आटोपला. स्कॉट एडवर्ड्सच्या नेतृत्वातील नेदरलँड्सला यंदाच्या विश्वचषकात ९ सामन्यांमध्ये २ विजय मिळवता आले. पण, नेदरलँड्सने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला पराभवाची धूळ चारून क्रिकेट विश्वाला धक्का दिला. त्यांनी आफ्रिकेला ३८ तर बांगलादेशला ८७ धावांनी पराभूत केले.
Web Title: In ODI World Cup 2023, IND vs NZ will face each other in the first semi-final and veteran spinner R Ashwin may get a chance to replace Suryakumar Yadav in Team India
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.