नवी दिल्ली : पाकिस्तानी संघ मैदानात असो की मग मैदानाबाहेर... शेजारील संघ नेहमी काही ना काही कारणास्तव चर्चेत असतो. मागील काही दिवसांपासून पाकिस्तान क्रिकेट बोर्डात नाट्यमय घडामोडी घडल्या. वन डे विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर बाबर आझमने कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर पीसीबीने काही धाडसी निर्णय घेत संघरचनाच बदलली. वहाब रियाजला निवड समितीचे प्रमुख बनवले, तर सईद अजमल यांसारखे प्रशिक्षक म्हणून संघाशी जोडले गेले. खरं तर पाकिस्तानी संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून तिथे कसोटी मालिका होणार आहे. अशातच पाकिस्तानच्या संघाचा फिनिशर म्हणून ओळख असलेल्या इफ्तिखार अहमदने केलेल्या एका विधानामुळे तो चर्चेत आहे.
पाकिस्तानी संघात मला पुरेपूर फलंदाजी करण्याची संधी मिळत नाही, असे अहमदने म्हटले. त्याने पाकिस्तानातील एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. त्याने सांगितले की, मी ट्वेंटी-२० सामने किती खेळले, वन डे किती खेळलो याबद्दल सतत चर्चा सुरू असते. पण, मला कोणत्या नंबरवर खेळवलं जातं, का खेळवलं जातं? मला स्वत:ला सिद्ध करण्याची किती संधी मिळते? याबद्दल कोणीच काही बोलत नाही. हे चुकीचे आहे... मी पाकिस्तानी संघात सातव्या क्रमांकावर खेळतो म्हणून फ्रँचायझी क्रिकेटमध्ये देखील तोच फॉर्म्युला माझ्याबाबतीत लागू केला जातो. यामुळे मला त्रास होत असून फलंदाजीची अधिक संधी मिळत नाही.
पाकिस्तानी खेळाडूची खदखद तसेच ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये वरच्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळाली तर नक्कीच शतक झळकावेन. वन डे मध्ये जर तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळाली तर आरामात द्विशतक झळकावेन. आता माझ्या नावावर वन डे क्रिकेटमध्ये शतकाची नोंद आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की, मला अधिक फलंदाजीची संधी मिळाली तर नक्कीच मी संघासाठी चांगली कामगिरी करू शकतो, संघाच्या विजयात योगदान देऊ शकतो, असे इफ्तिखार अहमदने सांगितले.
ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तानी संघ -शान मसूद (कर्णधार), आमिर जमाल, अब्दुला शफिक, अबरार अहमद, बाबर आझम, फरिम अश्रफ, हसन अली, इमाम-उल-हक, खुर्राम शेहजाद, मीर हमझा, मोहम्मद रिझवान, नौमान अली, मोहम्मद वसिम ज्युनियर, सैय्य अयुब, सलमान अली आघा, सरफराज अहमद, सौद शकील, शाहीन शाह आफ्रिदी.
पाकिस्तान विरूद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचे वेळापत्रक
पहिला सामना - १४ ते १८ डिसेंबर (पर्थ स्टेडियम)दुसरा सामना - २६ ते ३० डिसेंबर (मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड)तिसरा सामना - ३ ते ७ जानेवारी (सिडनी क्रिकेट ग्राऊंड)