PAK vs AFG : पहिल्या वन डे सामन्यात दारूण पराभव झाल्यानंतर अफगाणिस्ताननं दुसऱ्या सामन्यात जोरदार पुनरागमन केलं. जगातील सर्वात घातक गोलंदाजी अटॅक समजल्या जाणाऱ्या पाकिस्तानला आज अफगाणिस्ताननं धू धू धूतलं. पहिल्या विकेटसाठी बाबर आझमच्या संघाला ३९.५ षटकं वाट पाहावी लागली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानच्या सलामीवीरांनी चमकदार कामगिरी केली. सलामीवीर रहमानुल्लाह गुरबाज (१५१) आणि इब्राहिन जादरान (८१) यांनी पहिल्या बळीसाठी तब्बल २२७ धावांची भागीदारी नोंदवली. अफगाणिस्तानने निर्धारित ५० षटकांत ५ बाद ३०० धावा करून पाकिस्तानला ३०१ धावांचे तगडे लक्ष्य दिलं.
पाकिस्तानी संघात शाहीन शाह आफ्रिदी, हारिस रौफ आणि नसीम शाह हे त्रिकुट असताना देखील अफगाणी फलंदाजांनी त्यांना घाम फोडला. मालिकेतील सलामीच्या सामन्यात या त्रिकुटाने दमदार कामगिरी केली होती. हारिस रौफने पाच बळी घेऊन प्रतिस्पर्धी संघाची पहिल्या सामन्यात कंबर मोडली होती. मात्र, आजच्या सामन्यात अफगाणिस्तानचं फलंदाज वरचढ ठरलं.
४०व्या षटकातील पाचव्या चेंडूवर शाहीन आफ्रिदीने घातक वाटणाऱ्या जादरानला बाद करून पाकिस्तानी चाहत्यांना जागं केलं. २२७ धावांवर अफगाणिस्तानचा पहिला बळी गेला, त्यानंतर २५६ धावांवर शतकवीर गुरबाज उसामा मीरचा शिकार झाला. तर, राशिद खान (२) आणि शाहिदुल्ला (१) धाव करून माघारी परतला.
अफगाणिस्तानकडून रहमानुल्लाह गुरबाजने सर्वाधिक १५१ धावांची शतकी खेळी केली. त्यानं त्याच्या खेळीत एकूण १४ चौकार आणि ३ षटकार लगावले. तर जादरानने ८० धावा करताना ६ चौकार आणि २ षटकार मारले. पाकिस्तानकडून कोणत्याच गोलंदाजाला खास कामगिरी करता आली नाही. शाहीन आफ्रिदीने सर्वाधिक (२) बळी घेतले, तर उसामा मीर आणि नसीम शाह यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आलं.