Asia Cup 2022 : रोहित शर्मा, भुवनेश्वर कुमार, विराट कोहली, दिनेश कार्तिक यांच्यासह भारताचे अन्य खेळाडू आशिया चषक स्पर्धेसाठी दुबईत दाखल झाले आहेत. पण, राहुल द्रविडच्या ( Rahul Dravid) गैरहजेरीमुळे टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. दुबईला रवाना होण्याआधी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला अन् त्याला मायदेशातच रहावे लागले. अशात आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका कोण बजावेल, याची चर्चा सुरू झाली. BCCI ने द्रविडचा रिपोर्ट निगेटिव्ह आला तरच तो दुबईत जाईल, असे स्पष्ट केले. पण, आता भारतीय संघाची चिंता दूर करणारी बातमी समोर आली आहे.
हाती आलेल्या रिपोर्टनुसार व्ही व्ही एस लक्ष्मण ( VVS Laxman) द्रविड येईपर्यंत भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. रोहित शर्मा अँड टीम दुबईत दाखल झाली असून त्यांनी सरावालाही सुरुवात केली आहे. Cricbuzz ने दिलेल्या वृत्तानुसार भारताचा माजी फलंदाज व्ही व्ही एस लक्ष्मणही संघासोबत आहे. लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने नुकत्याच झिम्बाब्वे दौऱ्यावर ३-० असा विजय मिळवला. त्या संघाचे मुख्य प्रशिक्षकपद लक्ष्मणने बजावले होते आणि आता तिथूनच तो दुबईल दाखल झाला आहे. आशिया चषक स्पर्धेसाठी निवड न झालेले खेळाडू झिम्बाब्वेहून थेट मायदेशी परतले आहेत.
BCCI ने याबाबत अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. पण, २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत पार पडणाऱ्या आशिया चषक स्पर्धेत लक्ष्मणकडे मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी असेल. राहुल द्रविडचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर तो पुन्हा ही जबाबदारी हाती घेईल. लक्ष्मण बीसीसीआयच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा अध्यक्ष आहे आणि द्रविडच्या अनुपस्थितीत ही तात्पुरती तडजोड आहे.
भारतीय संघ - रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्षदीप सिंग, आवेश खान.
राखीव खेळाडू - श्रेयस अय्यर, दीपक चहर, अक्षर पटेल ( Standby: Shreyas Iyer, Deepak Chahar, Axar Patel)