नवी दिल्ली : ट्वेंटी-२० विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर भारतीय संघावर विविध माध्यमातून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. खरं तर पुढच्या वर्षी भारतात वनडे विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच संघ तयारीला लागले आहेत. भारतीय संघ देखील न्यूझीलंडच्या धरतीवर वनडे मालिका खेळत आहे, मात्र या मालिकेसाठी भारताच्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. यामध्ये संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि लोकेश राहुल यांचा समावेश आहे.
दरम्यान, भारतीय संघ आगामी विश्वचषकापूर्वी २५ वनडे सामने खेळणार आहे. ज्यातील दोन सामने न्यूझीलंडविरूद्ध सुरू असलेल्या मालिकेपूर्वीच खेळवण्यात आले आहेत. यावर बोलताना भारतीय संघाचा माजी खेळाडू मोहम्मद कैफने भारतीय संघाला मोलाचा सल्ला दिला आहे. विश्वचषक खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंची लवकरच निवड करण्याची गरज असल्याचे कैफने म्हटले आहे.
कैफने सांगितली भारताची डोकेदुखी प्राइम व्हिडीओवर मोहम्मद कैफने म्हटले, "अलीकडेच विश्वचषक जिंकलेल्या इंग्लंड संघाच्या खेळाडूंचे सरासरी वय ३१ वर्षे होते, त्यामुळे अनुभवी खेळाडूंचा नेहमीच काही ना काही उपयोग होत असतो हे स्पष्ट झाले. जर भारताला विश्वचषकाची तयारी सुरू करायची असेल, तर त्यांना न्यूझीलंडविरुद्धच्या सध्याच्या मालिकेपासून सुरुवात करावी लागेल. कारण आता फारसे वनडे सामने होणार नाहीत, कदाचित विश्वचषकापर्यंत फक्त २५ वनडे असतील." एकूणच कैफने संघात अनुभवी खेळाडू असावेत असे म्हटले आहे.
"डायमंड शोधायच्या नादात आम्ही सोनं गमावलं""भारतीय संघाची प्रमुख समस्या गोलंदाजी आहे. तुम्ही पाहिलं तर शार्दुल ठाकूर दुसरा वनडे सामना खेळला नाही, तर आपल्या मोहम्मद सिराजला देखील घरी पाठवलं, तो इथे वनडे खेळू शकला असता. भुवनेश्वर कुमार भारतीय संघात का नाही, मला माहित आहे, तो एक चांगला गोलंदाज आहे, मात्र त्याला संघात स्थान नाही. नव्या खेळाडूंच्या शोधात आपण जुन्या खेळाडूंना विसरत आहोत. एक म्हण आहे, हिऱ्याच्या शोधात आम्ही सोनं गमावलं", अशा शब्दांत मोहम्मद कैफने भारतीय संघाच्या संघ व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"