आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये आज होणाऱ्या आपल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाची गाठ अफगाणिस्तानशी पडणार आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये होणाऱ्या या सामन्यामध्ये भारतीय क्रिकेटप्रेमींना संघाकडून दणदणीत विजयाची अपेक्षा असेल. मात्र अफगाणिस्तानच्या संघाला कमी लेखणे भारतीय संघाला परवडणारे नाही. २०१९ च्या वर्ल्डकप स्पर्धेमध्ये भारतीय संघाला अफगाणिस्तानने चांगलेच झुंजवले होते. दरम्यान, २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला केवळ दोन सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली होती. मात्र आज तो संघाचा प्रमुख खेळाडू बनला आहे. तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात रवींद्र जडेजाने ऑस्ट्रेलियाच्या डावाला सुरुंग लावला होता.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताच्या जवळपास सर्वच गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली होती. त्यातही लेगस्पिनर रवींद्र जडेजाने ऑस्ट्रेलियाच्या मधल्या फळीतील तीन प्रमुख फलंदाजांचे बळी टिपत कांगारूंना दोनशेच्या आत गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. दरम्यान, कुलदीप यादवसोबत रवींद्र जडेजा आजच्या सामन्यामध्येही उपयुक्त ठरू शकतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रवींद्र जडेजाची ओळख मॅचविनर खेळाडू अशी आहे. तो फलंदाजी आणि गोलंदाजीबरोबरच क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातूनही सामन्याचं पारडं फिरवण्याची क्षमता बाळगतो. पहिल्याच सामन्यातून त्याने आपण फॉर्ममध्ये असल्याचे संकेत दिले आहेत.
उल्लेखनीय बाब म्हणजे याच रवींद्र जडेजाला २०१९ मध्ये केवळ दोन सामन्यांमध्येच खेळण्याची संधी मिळाली होती. बहुतांश सामन्यांमध्ये त्याला बेंचवरच बसावे लागले होते. त्यावेळी कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल हे प्रमुख फिरकी गोलंदाज असल्याने रवींद्र जडेजाला संधी मिळाली नव्हती. त्या स्पर्धेत खेळलेल्या दोन सामन्यांमध्ये जडेजाने ७७ धावा आणि २ बळी टिपले होते. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात जडेजाला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. तर गोलंदाजीत त्याने १० षटकांमध्ये ४० धावा देऊन दोन बळी टिपले होते.
तर न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्येही रवींद्र जडेजाला संघात स्थान मिळालं होतं. जडेजाने या महत्त्वाच्या सामन्या किफायतशीर गोलंदाजी करताना १० षटकांत ३४ धावा देत एक बळी टिपला होता. तर ७७ धावांची झुंजार खेळी करून भारताला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवले होते. मात्र तो बाद झाल्यानंतर भारताचा डाव गडगडला होता आणि टीम इंडियाला १८ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. आता मागच्या वर्ल्डकपमध्ये मिळालेल्या कमी संधीची भरपाई रवींद्र जडेजा हा या विश्वचषक चांगली कामगिरी करून करू शकतो.