indw vs banw 2023 | मिरपूर : भारतीय महिला संघाने बांगलादेशचा पराभव करून ट्वेंटी-२० मालिकेत विजयी सलामी दिली आहे. या विजयासह हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात टीम इंडियाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना यजमान बांगलादेशच्या संघाला काही खास कामगिरी करता आली नाही. भारतीय गोलंदाजांच्या अप्रतिम कामगिरीमुळे बांगलादेशचा संघ २० षटकांत ५ बाद केवळ ११४ धावा करू शकला. ११५ धावांच्या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने सहज लक्ष्य गाठले.
बांगलादेशकडून शोरना एक्टरने सर्वाधिक २८ धावांची नाबाद खेळी केली. तर सोभना मोस्टरी (२३) आणि सलामीवीर शाथी राणी बोरमोन (२२) धावा करून तंबूत परतली. भारतीय गोलंदाजांनी सांघिक कामगिरी करत सुरूवातीपासूनच सामन्यात आपली पकड मजबूत केली. भारताकडून पूजा वस्त्राकर, शेफाली वर्मा आणि पदार्पणाचा सामना खेळत असलेल्या मिन्नू मणीने (१) बळी घेऊन यजमान संघाला ११४ पर्यंत रोखले.
भारताची विजयी सलामी११५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला शेफाली वर्माच्या (०) रूपात मोठा झटका बसला. पण कर्णधार हरमनप्रीत कौर नाबाद (५४) आणि उप कर्णधार स्मृती मानधना (३८) यांनी डाव सावरला आणि विजयी सलामी दिली. भारतीय संघाने १६.२ षटकांत ३ बाद ११८ धावा करून २२ चेंडू राखून मोठा विजय मिळवला. कर्णधार हरमनने ६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३५ चेंडूत ५४ धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली. आपल्या अप्रतिम अर्धशतकी खेळीमुळे कर्णधार हरमनप्रीतला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.