नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या संघाने आपल्या घरात विश्वविजेत्या इंग्लंडला 3-0 ने पराभूत करून आयसीसी क्रमवारीत गरूडझेप घेतली आहे. गतविजेत्या इंग्लिश संघाची आयसीसी क्रमवारीत दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. त्यामुळे न्यूझीलंडच्या संघाने पहिले स्थान गाठले आहे. अलीकडेच पार पडलेल्या एकदिवसीय मालिकेत इंग्लिश संघाला कांगारूकडून 3-0 ने पराभव स्वीकारावा लागला.
ऑस्ट्रेलियाच्या जीवावर किवी 'शेर'दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या चमकदार खेळीच्या जोरावर किवी संघाने अव्वल स्थान गाठले आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील मालिका सुरू होण्यापूर्वी इंग्लिश संघ 119 रेटिंग गुणांसह अव्वल स्थानी विराजमान होता. न्यूझीलंडपेक्षा इंग्लंडचे पाच गुण जास्त होते. मात्र सलग झालेल्या तीन पराभवामुळे इंग्लंडला मोठा फटका बसला आणि त्यांनी 6 गुण गमावले. अखेर न्यूझीलंडने 114 गुणांसह पहिले स्थान पटकावले आहे, तर इंग्लिश संघ आता 113 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे.
ऑस्ट्रेलियाच्या संघाला देखील त्यांच्या अप्रतिम कामगिरीचे बक्षीस मिळाले असून त्यांनी 112 गुणांसह चौथ्या स्थानी झेप घेतली. पाकिस्तानचा संघ 107 गुणांसह पाचव्या स्थानी फेकला गेला. खरं तर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांचे गुण समान आहेत. 112 रेटिंग गुणांसह भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि ऑस्ट्रेलिया 112 गुणांसह चौथ्या क्रमांकावर स्थित आहे. जानेवारी 2023 मध्ये इंग्लंडचा संघ दक्षिण आफ्रिकेविरूद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा अव्वल स्थान गाठण्याची संधी असेल.
भारताला पहिला क्रमांक पटकावण्याची सुवर्णसंधीसध्या भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे, तिथे 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. 25 नोव्हेंबरपासून या मालिकेचा थरार रंगणार आहे. शिखर धवनच्या नेतृत्वात भारतीय संघाला आयसीसी क्रमवारीतील पहिले स्थान गाठणे हे आव्हान असणार आहे. कारण सध्या किवी संघ 114 गुणांसह क्रमवारीत पहिल्या स्थानी विराजमान आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात केवळ 2 गुणांचा फरक आहे. त्यामुळे भारतीय संघ किवी संघाला त्यांच्याच घरात पराभूत करून क्रमवारीत मोठी झेप घेऊ शकतो.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"