नवी दिल्ली : वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत आज नेदरलॅंड्स आणि झिम्बाब्वे आमनेसामने होते. नवख्या नेदरलॅंड्सने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ६ बाद ३१५ धावांचा डोंगर उभारला. सामना एकतर्फी होईल असे सर्वांना वाटत असतानाच पुन्हा एकदा 'जो जिता वही सिकंदर'चा प्रत्यय आला. झिम्बाब्वेच्या सिकंदर रझाने अष्टपैलू खेळी करून नेदरलॅंड्सच्या तोंडचा घास पळवला. सिकंदरने ४ बळी आणि शतकी खेळी करून सामना आपल्या नावावर केला.
या शतकासह रझाने आपल्या नावावर एका विक्रमाची नोंद केली आहे. खरं तर झिम्बाब्वेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेगाने शतक ठोकणारा फलंदाज सिकंदर रझा ठरला आहे. त्याने केवळ ५४ चेंडूत ८ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने शतक पूर्ण केले.
तत्पुर्वी, झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून नेदरलॅंड्सला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करताना सांघिक खेळीच्या जोरावर नेदरलॅंड्सने ३१५ धावा केल्या. नेदरलॅंड्सकडून विक्रमजीत सिंग (८८), मॅक्स ओ दाऊद (५९) आणि स्कॉट एडवर्ड्स (८३) यांना चांगली खेळी केली. तर झिम्बाब्वेकडून सिकंदर रझाने सर्वाधिक ४ बळी घेऊन प्रतिस्पर्धी संघाला ३१५ धावांपर्यंत रोखले. 'जो जीता वही सिकंदर'३१६ धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेची शानदार सुरूवात झाली. पण संघाच्या ८० धावांवर संघाला पहिला झटका बसला. आघाडीच्या फलंदाजांनी सावध खेळी करून विजयाकडे कूच केली पण नेदरलॅंड्सच्या गोलंदाजांनी देखील आक्रमक मारा करून झिम्बाब्वेला धक्के दिले. मात्र, सिंकदर रझा प्रतिस्पर्धी संघासाठी काळ ठरला. त्याने ५४ चेंडूत १०२ धावांची ऐतिहासिक खेळी करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला.