shaheen afridi angry video । लाहोर : पाकिस्तान सुपर लीगच्या (PSL) पहिल्या क्वालिफायर सामन्यात मुल्तान सुल्तानच्या संघाने लाहोर कलंदर्सचा पराभव करून अंतिम फेरी गाठली. शाहीन आफ्रिदीच्या नेतृत्वातील लाहोरचा तब्बल 84 धावांनी पराभव करून मोहम्मद रिझवानच्या संघाने सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला. मुल्तानकडून कायरन पोलार्डने 34 चेंडूत 57 धावा कुटल्या. 1 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने पोलार्डने आफ्रिदीच्या संघाची डोकेदुखी वाढवली. प्रथम फलंदाजी करताना मुल्तान सुल्तानच्या संघाने 20 षटकांत 160 धावा केल्या.
दरम्यान, लाहोर कलंदर्सच्या संघाच्या गोलंदाजांची धुलाई पाहून कर्णधार शाहीन आफ्रिदी चांगलाच संतापल्याचे पाहायला मिळाले. लाईव्ह सामन्यातच आफ्रिदीने पोलार्डवर आपला राग व्यक्त केला. हा सर्व प्रकार पहिल्या डावातील अखेरच्या षटकादरम्यान झाला. खेळपट्टीवर कायरन पोलार्डवर स्फोटक खेळी करत होता. अखेरच्या षटकात जास्तीत जास्त धावा करण्याच्या प्रयत्नात असलेल्या पोलार्डला रोखण्यासाठी लाहोरचा कर्णधार शाहीन आफ्रिदी गोलंदाजीसाठी आला.
अखेरचे षटक टाकण्यासाठी आलेल्या आफ्रिदीची धुलाई होताच त्याला राग अनावर झाला. शाहीन स्वत:वर नियंत्रण ठेवू शकला नाही आणि व्यतिथ होऊन पोलार्डशी वाद घालू लागला. पोलार्डने देखील त्याच्याच शैलीत प्रत्युत्तर देत शाहीनला सुनावले. प्रकरण आणखी वाढत असताना इतर खेळाडूंनी मध्यस्थी करून वाद आटोक्यात आणला. खरं तर शाहीन आफ्रिदीसाठी क्वालिफायर एकचा सामना एका वाईट स्वप्नाप्रमाणे होता. कारण त्याने त्याच्या 4 षटकांत तब्बल 47 धावा दिल्या. तसेच त्याला एक देखील बळी घेता आला नाही.
पराभवानंतर लाहोरला आणखी 1 संधी स्पर्धेच्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात पराभूत झाल्यानंतर लाहोर कलंदर्सच्या संघाला अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी आणखी एक संधी असणार आहे. लाहोर कलंदर्सचा सामना आता एलिमिनेटरमध्ये इस्लामाबाद युनायटेड आणि पेशावर झाल्मी यांच्यातील विजेच्या संघासोबत होईल. 16 मार्च रोजी एलिमिनेटरचा सामना होणार आहे. पहिल्या क्वालिफायर सामन्यात लाहोर कलंदर्सचा संघ अवघ्या 76 धावांवर सर्वबाद झाला. अखेर सांघिक खेळीच्या जोरावर मुल्तानच्या संघाने 84 धावांनी विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"