ban vs ire 2nd odi । सिल्हेट : बांगलादेश आणि आयर्लंड यांच्यातील दुसऱ्या वन डे सामन्यात बांगलादेशच्या संघाने इतिहास रचला आहे. यष्टीरक्षक फलंदाज मुशफिकर रहीमने अवघ्या 60 चेंडूत शतक झळकावून धावांचा डोंगर उभारला. मुशफिकुर रहीमचे झंझावाती शतक, नजमुल हुसेन शांतो आणि लिटन दास यांच्या अर्धशतकांच्या जोरावर बांगलादेश क्रिकेट संघाने सिल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या वन डे सामन्यात आयर्लंडसमोर 350 धावांचे विशाल लक्ष्य ठेवले.
दरम्यान, मुशफिकुर रहीमनने 60 चेंडूत 14 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने झंझावाती शतक झळकावले. लक्षणीय बाब म्हणजे मुशफिकुर बांगलादेशकडून वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा खेळाडू ठरला आहे. त्याच्याशिवाय शांतोने 77 चेंडूत 73 धावा केल्या, तर लिटन दासने 71 चेंडूत 70 धावांची उल्लेखणीय खेळी केली. याशिवाय तौहीद हृदयीने 34 चेंडू खेळून 49 धावांचे योगदान देऊन धावांचा आकडा 300 पार नेला. सांघिक खेळीच्या जोरावर बांगलादेशने 6 गडी गमावून 349 धावा केल्या. खरं तर या फॉरमॅटमध्ये बांगलादेशची ही सर्वात मोठी धावसंख्या ठरली आहे.
आयर्लंडकडून ग्राम ह्यूमने सर्वाधिक 3 बळी घेतले, तर मार्क एडेअर, कर्टिस कॅम्फर यांना प्रत्येकी 1-1 बळी घेण्यात यश आले. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 6 बाद 349 धावा केल्या. मुशफिकुर रहीमने 60 चेंडूत 14 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 100 धावांची ऐतिहासिक खेळी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"