तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून यजमान भारताने २-० ने विजयी आघाडी घेतली आहे. यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे यांच्या अप्रतिम खेळीच्या जोरावर भारताने दुसरा सामना सहज जिंकला. जैस्वाल आणि दुबे यांनी तिसऱ्या बळीसाठी ९६ धावांची भागीदारी नोंदवली. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली स्वस्तात बाद झाल्यानंतर युवा शिलेदारांनी मोर्चा सांभाळला. भारताने २६ चेंडू आणि ६ गडी राखून विजय मिळवला अन् मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली.
अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० सामन्यात विराट कोहलीने १४ महिन्यांनंतर या फॉरमॅटमध्ये पुनरागमन केले. या सामन्यादरम्यान एक चाहता सुरक्षाकांना चकवा देत कोहलीला भेटायला मैदानात गेला. भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज विराट कोहलीच्या चाहत्यांची कमतरता नाही. हा खेळाडू जगभरात कुठेही गेला तरी चाहते त्याला भेटण्याच्या आशेने स्टेडियम गाठतात. अशा परिस्थितीत भारतातील त्याच्या चाहत्यांना विचारण्याची गरज नाही.
४२९ दिवसांनंतर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या विराट कोहलीने या सामन्यात आपल्या स्फोटक फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. टी-२० विश्वचषकापूर्वी त्याच्या पुनरागमनानंतर अशा खेळीमुळे स्पर्धेत खेळण्याच्या त्याच्या आशा आणखी वाढल्या आहेत. फलंदाजीला येण्यापूर्वी विराट कोहलीसोबत असे काही घडले जे अनेकवेळा पाहायला मिळाले आहे. सामन्यादरम्यान, एक व्यक्ती त्याच्या जवळ आला आणि त्याच्या पायाला स्पर्श केला आणि कोहलीला मिठी देखील मारली.
पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात नेले
अफगाणिस्तानच्या फलंदाजीदरम्यान विराट कोहली १८व्या षटकात सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असताना एका चाहत्याने सुरक्षा रक्षकांना चकवा देत त्याच्यापर्यंत पोहोचला. तो माणूस विराट कोहलीच्या दिशेने धावला. सगळ्यात आधी त्याने खाली वाकून कोहलीच्या पायाला स्पर्श केला आणि मग त्याला घट्ट मिठी मारली. तो काही वेळ मिठी मारण्यात यशस्वी झाला आणि त्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तेथे येऊन त्याला पकडले. या घटनेनंतर पोलिसांनी सदर व्यक्तीला पकडून पोलिस ठाण्यात नेले.