नवी दिल्ली: अयोध्येत होणाऱ्या भव्य राम मंदिराच्या पायाभरणीच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळींना या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी राम मंदिर ट्रस्टकडून आमंत्रण देण्यात आले आहे. यावरून राजकारण देखील चांगलेच तापले असून सत्ताधारी भाजपा आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच पाकिस्तानच्या क्रिकेट संघाचा माजी खेळाडू दानिश कनेरियाने एक पोस्ट केली, जी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. हिंदूंच्या समर्थनार्थ बोलणारा पाकिस्तानी खेळाडू म्हणून कनेरियाची ओळख आहे.
त्याने पोस्टच्या माध्यमातून म्हटले की, आमचा राजा श्री रामाचे भव्य मंदिर तयार आहे आणि आता फक्त ८ दिवसांची प्रतीक्षा आहे. यासोबतच त्याने जय-जय श्री रामचा नारा देखील दिला. दानिश कनेरिया हा पाकिस्तानी हिंदू आहे. त्याचा जन्म कराची येथे झाला. २००० ते २०१० दरम्यान तो पाकिस्तान क्रिकेट संघाकडून खेळला आहे. तो पाकिस्तानी संघाचा मुख्य फिरकी गोलंदाज होता. त्याच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये २५० हून अधिक बळींची नोंद आहे.
रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या सदस्याने दिलेल्या माहितीनुसार, प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात ११,००० हून अधिक पाहुणे आणि निमंत्रितांना संस्मरणीय भेटवस्तू देण्याची व्यवस्था केली जात आहे. दरम्यान, २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येतील भव्य मंदिरात रामलला विराजमान होणार आहेत. राम मंदिरात मूर्ती स्थापनेची वेळ १२.२९ मिनिटे ८ सेकंद ते १२.३० मिनिटे ३२ सेकंद अशी असेल. प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त फक्त ८४ सेकंदांचा असणार आहे.
२२ तारखेला विविध क्षेत्रातील नामांकित मंडळी अयोध्येला पोहचतील. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना २२ तारखेनंतर दर्शनाला येण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले की, आपापल्या क्षेत्रातील लोकांना २२ जानेवारीनंतरच रामललाच्या दर्शनाला घेऊन जा. २२ जानेवारी रोजी राम मंदिराची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. त्यामध्ये देशातील निवडक लोकांना निमंत्रण देण्यात आले आहे. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर लोक अयोध्येत येण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी असे आवाहन केले.
Web Title: In the wake of the ongoing Ram Temple in Ayodhya, former Pakistan cricketer Danish Kaneria posted a post saying Jai Shri Ram
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.