manasi joshi paralympics : पॅरा बॅडमिंटन स्टार मानसी जोशीने क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि सुरेश रैना यांच्यावर त्यांच्या एका कृतीचा दाखला देत बोचरी टीका केली. भज्जी आणि रैनासह युवराज सिंगने विजयानंतर केलेले भन्नाट सेलिब्रेशन सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. पण, आता मानसीने यावर आक्षेप घेत अपंगांचा अपमान केला असल्याचे म्हटले आहे. माजी खेळाडूंच्या व्हायरल व्हिडीओवर व्यक्त होताना मानसी जोशीने आपला संताप व्यक्त केला. शनिवारी वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स लीग २०२४ च्या अंतिम सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान हे संघ भिडले. इंग्लंडच्या धरतीवर झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने शानदार विजय मिळवला. यासह युनूस खानच्या नेतृत्वातील पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला. या विजयानंतर हरभजन आणि रैनाने हे अनोखे सेलिब्रेशन केले.
मानसी जोशीने कमेंटच्या माध्यमातून म्हटले की, जर तुम्ही पोलिओ असलेल्या लोकांच्या चालण्याच्या पद्धतींची थट्टा करत असाल तर हे खूप दुर्दैवी आहे. यामुळे भारतातील अपंग मुलांवर गुंडगिरी, अन्याय करणे सहज शक्य होईल. हे सेलिब्रेशन नसून अपंग लोकांची थट्टा केली जात आहे. खरे तर मानसीने तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर स्टोरीच्या माध्यमातूनही याविरोधात आवाज उठवला. अनेकांनी तिला समर्थन देताना तिच्या मुद्द्याच्या समर्थनार्थ पोस्ट केल्या आहेत.
या स्पर्धेत भारत सिक्सर किंग युवराज सिंगच्या नेतृत्वात होता. इंडिया चॅम्पियन्सकडून अंबाती रायुडूने अंतिम सामन्यात सर्वाधिक खेळी केली, त्याने २ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ३० चेंडूत ५० धावा कुटल्या. या खेळीमुळे त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज इरफान पठाणने प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराला बाद करून जुन्या आठवणींना उजाळा दिला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानला म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही. त्यांनी निर्धारित २० षटकांत ६ बाद १५६ धावा केल्या. भारताकडून अनुरीत सिंगने सर्वाधिक तीन बळी घेतले. पाकिस्तानने दिलेल्या १५७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने १९.१ षटकांत ५ बाद १५९ धावा करून चॅम्पियन होण्याचा मान पटकावला. कर्णधार युवराज सिंगने नाबाद १५ आणि इरफान पठाणने नाबाद ५ धावांची खेळी केली आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. इरफानने विजयी चौकार लगावताच चाहत्यांनी एकच जल्लोष केला.