नवी दिल्ली : अंडर-१९ विश्वचषकाच्या पात्रता फेरीच्या सामन्यात नवख्या अमेरिकेच्या संघाने भीमपराक्रम केला आहे. अमेरिकेच्या संघाने ऐतिहासिक कामगिरी करताना पुरुषांच्या विश्वचषक पात्रता सामन्यात तब्बल ५१० धावा केल्या असून ४५० धावांनी विजय मिळवला. लक्षणीय बाब म्हणजे अंडर-१९ क्रिकेटमधला हा सर्वात मोठा विजय आहे. प्रथम फलंदाजी करताना अमेरिकेच्या संघाने निर्धारित ५० षटकांत आठ गडी गमावून ५१५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात अर्जेंटिनाचा संघ १९.५ षटकांत ६५ धावांत गारद झाला. या विजयासह अमेरिकेच्या संघाने ऑस्ट्रेलियाचा मोठा किल्ला उद्ध्वस्त केला आहे.
अमेरिकेने उभारला धावांचा डोंगरप्रथम फलंदाजी करताना अमेरिकेच्या संघाने अर्जेंटिनाच्या गोलंदाजांना घाम फोडला. अमेरिकन संघाने धावांचा डोंगर उभारून सर्वांचे लक्ष वेधले. अमेरिकेकडून भव्य मेहताने ९१ चेंडूत १३६ धावांची सर्वाधिक खेळी केली, तर ऋषी रमेशने ५९ चेंडूत १०० धावा करून शतकी खेळी केली. याशिवाय अर्जुन महेशने ४४ चेंडूत ६७ धावा केल्या. तर, प्रणव चेट्टीपलयमला ४३ चेंडूत ६१ धावा, अमोघ अरेपल्लीला ३० चेंडूत ४८ धावा आणि उत्कर्ष श्रीवास्तवला २२ चेंडूत ४५ धावा करण्यात यश आले.
डोंगराएवढ्या आव्हानासमोर अर्जेंटिना चीतपटअमेरिकेने दिलेल्या भल्यामोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना अर्जेंटिनाचा संघ निर्धारित ५० षटके देखील खेळू शकला नाही अन् १९.५ षटकांत सर्वबाद झाला. अरिन नाडकर्णीच्या घातक गोलंदाजीसमोर अर्जेंटिनाचा संघ १९.५ षटकांत ६५ धावांत सर्वबाद झाला. संघाच्या आठ फलंदाजांना दुहेरी आकडा देखील पार करता आला नाही. अरिन नाडकर्णीने सहा षटकांत २१ धावा देत सहा बळी घेतले, तर आर्यन सतीशने दोन बळी घेऊन अमेरिकेच्या ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केला.
ऑस्ट्रेलियाचा मोठा विक्रम मोडीतअंडर-१९ क्रिकेटच्या इतिहासात हा सर्वात मोठा विजय ठरला आहे. अंडर-19 क्रिकेट संघाच्या सर्वात मोठ्या विजयाचा विक्रम आता अमेरिकेच्या नावावर झाला आहे. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. तेव्हा कांगारूच्या संघाने २०२२ मध्ये केनियाचा २३० धावांनी पराभव केला होता.
अंडर-१९ क्रिकेटमधील सर्वात मोठे विजय
- अमेरिका - ४५० धावांनी विजय विरूद्ध अर्जेंटिना - २०२३
- ऑस्ट्रेलिया - ४३० धावांनी विजय विरूद्ध केनया - २०२२
- भारत - ३२६ धावांनी विजय विरूद्ध युंगाडा - २०२२
- ऑस्ट्रेलिया - ३११ धावांनी विजय विरूद्ध पापुआ न्यू गिनी - २०१८
- श्रीलंका - ३११ धावांनी विजय विरूद्ध केनया - २०१८
- वेस्ट इंडिज - ३०१ धावांनी विजय विरूद्ध स्कॉटलंड - २०२२