WBBL 2024 : ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या महिला बिग बॅश लीग (WBBL) दरम्यान, क्रिकेटच्या मैदानात क्वचितच दिसणारी दुर्घटना घडली. खरे तर इतर खेळांच्या तुलनेत क्रिकेटमध्ये दुखापत होण्याची शक्यता कमी असते. कबड्डी, फुटबॉल यांसारख्या खेळांमध्ये अनेकदा खेळाडूंना दुखापत होत असते. क्रिकेटमध्येदेखील काही घडना घडत असतात, ज्यामुळे खेळाडूंना मैदानातून बाहेर जावे लागते. ऑस्ट्रेलियाच्या एका महिला यष्टीरक्षकाला चेंडूला थांबवताना दुखापत झाली. खरे तर झाले असे की, चेंडू निर्धाव गेला आणि यष्टीरक्षकाच्या डोळ्याला लागला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
महिला बिग बॅश लीगमध्ये एडिलेड स्ट्रायकर्स आणि सिडनी सिक्सर्स यांच्यात सामना झाला. ज्यामध्ये सिडनी सिक्सर्सचा संघ फलंदाजी करत होता. त्यानंतर डावाच्या चौथ्या षटकात डार्सी ब्राऊन गोलंदाजीला आली आणि तिच्या षटकातील पाचवा चेंडू फलंदाजाला खेळता आला नाही. त्यामुळे निर्धाव गेलेला चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या दिशेने गेला. २९ वर्षीय ब्रिजेट पॅटरसन ही यष्टीरक्षक होती. निर्धाव चेंडू एक टप्पा घेऊन यष्टीरक्षकापर्यंत पोहोचला. चेंडूने उसळी घेतल्याने तिच्या डोळ्याजवळ आदळला. चेंडू लागताच ती जमिनीवर पडली आणि त्यानंतर तिला उपचारासाठी मैदानाबाहेर नेण्यात आले. एकूणच यष्टीरक्षकाच्या एका चुकीमुळे तिला गंभीर दुखापत झाली.
दरम्यान, एडिलेड स्ट्रायकर्स आणि सिडनी सिक्सर्स यांच्यातील सामन्याबद्दल भाष्य करायचे झाले तर, फलंदाजी करताना यष्टीरक्षक ब्रिजेट पॅटरसनने एडिलेड संघासाठी ३२ चेंडूत सहा चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने सर्वाधिक ४४ धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना एडिलेडच्या संघाने १७१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात सिडनी सिक्सर्सची कर्णधार एलिसा पेरीने २८ चेंडूंत ११ चौकारांसह ५४ धावांची खेळी केली. तर सारा ब्राइसने ४४ चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांसह ६२ धावा केल्या. या दोघांच्या खेळीनंतरही सिडनीचा संघ विजय मिळवू शकला नाही आणि ९ विकेट गमावून केवळ १६० धावाच करू शकला. त्यामुळे एडिलेडने हा सामना ११ धावांनी जिंकला.