WPL 2023 । मुंबई : महिला प्रीमिअर लीग 2023 चा (Women's Premier League) पहिला हंगाम अंतिम टप्प्यात आहे. या हंगामातील शेवटचे दोन साखळी सामने 21 मार्च रोजी अर्थात आज खेळवले जात आहेत. आज मुंबई इंडियन्स विरूद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि यूपी वॉरियर्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार आहे. आरसीबी आणि गुजरात जायंट्सचे संघ स्पर्धेच्या प्लेऑफ शर्यतीतून आधीच बाहेर पडले आहेत, तर यूपी, मुंबई आणि दिल्लीला थेट अंतिम फेरी गाठण्याची संधी आहे. सध्या मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर आहेत. यूपीचा संघ आठ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर स्थित आहे.
महिला प्रीमिअर लीगच्या नियोजनानुसार, गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेला संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असलेल्या संघांना अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी प्लेऑफ सामना खेळावा लागेल. 26 मार्च रोजी ब्रेबॉर्न स्टेडियमवर अंतिम सामना होणार आहे. त्यामुळे थेट अंतिम फेरी गाठण्यासाठी मुंबई इंडियन्स, यूपी वॉरियर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या तिन्ही संघामध्ये चुरस पाहायला मिळणार आहे.
दिल्ली कॅपिटल्स मेग लॅनिंगच्या नेतृत्वातील दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने 20 मार्च रोजी मुंबईचा पराभव केला आणि गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले. खरं तर आताच्या घडीला दोन्ही संघांचे समान गुण असले तरी नेट रनरेटमुळे दिल्ली अव्वल स्थानी आहे. दिल्लीला अव्वल स्थानी कायम राहण्यासाठी आज यूपीचा पराभव करावा लागेल. याशिवाय मुंबई इंडियन्सचा आरसीबीकडून पराभव होणे गरजेचे आहे. जर मुंबई मोठ्या फरकाने सामना जिंकला तर दिल्लीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पण जर सर्व दिल्लीच्या बाजूने झाले तर दिल्लीचा संघ थेट फायनलमध्ये जाईल.
मुंबई इंडियन्स हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबईच्या संघाने सलग 5 विजय मिळवत गुणतालिकेत वर्चस्व गाजवले. पण आरसीबी आणि दिल्लीकडून झालेल्या लागोपाठ दोन पराभवांनी मुंबईच्या संघाची गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी घसरण झाली. आता थेट फायनलमध्ये जाण्यासाठी मुंबईला केवळ आरसीबीवरच मात करावी लागणार नाही, तर त्यांच्या विजयाचे अंतर दिल्लीच्या विजयापेक्षा 33 धावांनी अधिक असावे लागणार आहे. पण दिल्लीचा आज पराभव झाला तर मुंबईचा केवळ विजय संघाला फायनलमध्ये पोहचवेल.
यूपी वॉरियर्स ॲलिसा हिलीच्या यूपी वॉरियर्सला अव्वल स्थानी जाण्यासाठी विजयांसह आश्चर्यकारक निकालांची आशा करावी लागेल. दिल्ली आणि मुंबईला मागे टाकून फायनलमध्ये जाण्यासाठी त्यांना अखेरच्या सामन्यांत तब्बल 130 धावांनी विजय मिळवावा लागेल. यासह आरसीबीचा संघ मुंबईला 150 हून अधिक धावांनी पराभूत करेल अशी अपेक्षा करावी लागेल. तरच यूपीचा संघ नेट रन रेटमध्ये भरारी घेऊ शकतो.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"