नवी दिल्ली : भारत २०१९-२०२३ या कालावधीत ८१ सामन्यांचे यजमानपद भूषविणार आहे. सध्याच्या दौरा कार्यक्रमाच्या (एफटीपी) तुलनेत सामन्यांची संख्या ३० ने अधिक आहे. पण व्यस्त क्रिकेटपटूंना प्रत्येक वर्षी कमी दिवस क्रिकेट खेळावे लागणार आहे. कारण बीसीसीआयने कमी मानांकन असलेल्या संघांसोबत कसोटी सामन्यांच्या संख्येत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
सोमवारी बीसीसीआयच्या विशेष आमसभेमध्ये (एसजीएम) सदस्यांदरम्यान एफटीपीवर सर्वांचे सहमत झाले. पुढील एफटीपीदरम्यान भारत मायदेशात इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि आॅस्ट्रेलियाविरुद्ध हायप्रोफाईल मालिका खेळणार आहे. याव्यतिरिक्त कर्णधार विराट कोहलीने खेळाडूंच्या थकव्याबाबत केलेल्या तक्रारीची दखल घेण्यात आली आहे. आता कार्यकारी समिती यावर अंतिम निर्णय घेईल. यात बीसीसीआयच्या तीन पदाधिकाºयांचा समावेश आहे.
बैठकीनंतर बोर्डाचे कार्यकारी सचिव अमिताभ चौधरी पत्रकारांसोबत बोलताना म्हणाले, ‘यापूर्वी पाच वर्षांच्या (२०१९-२०२३) कालावधीपर्यंत प्रस्तावित एफटीपीमध्ये क्रिकेटच्या सर्व स्वरूपातील ५१ सामन्यांचे प्रावधान होते. नव्या प्रस्तावामध्ये या कालावधीत मायदेशातील ८१ सामन्यांचे प्रावधान आहे.’
चौधरी म्हणाले, ‘मायदेशातील मालिकांमध्ये होणाºया सामन्यांत दिवसांची संख्या २० टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे; पण सामन्यांची संख्या ६० टक्क्यांनी वाढविण्यात आली आहे.’
३०६ दिवस खेळावे लागेल
कोहलीने थकव्याबाबत उपस्थित केलेल्या मुद्यावर विचार करण्यात आल्याचे सांगताना चौधरी म्हणाले, ‘भारतीय संघाला २०१५ ते २०१९ या कालावधीत सर्व प्रकारच्या (देश व विदेश) क्रिकेटमध्ये ३९० दिवस खेळायचे होते. नव्या प्रस्तावामध्ये २०१९ ते २०२३ या कालावधीत ३०६ दिवस क्रिकेट खेळावे लागेल.’
याचा अर्थ गेल्या एफटीपीमध्ये भारतीय संघाला सरासरी वार्षिक ९७.५ दिवस खेळायचे होते, तर पुढील एफटीपीमध्ये ७६.५ दिवस खेळावे लागेल. त्यात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी व विश्वकप स्पर्धेतील लढतींचा समावेश नाही. त्याचे अनुक्रमे २०२१ व २०२३ मध्ये भारतात आयोजन होणार आहे.’
नवा एफटीपी कार्यक्रम तयार करताना आॅक्टोबर २०१८ मध्ये बीसीसीआयला चांगला प्रसारण करार मिळावा, याची दखल घेण्यात आली आहे. सध्या सर्व प्रसारण अधिकार स्टार स्पोर्टस्कडे आहे. हा करार २०१८ मध्ये संपणार आहे.
अन्य प्रकरणात बीसीसीआयने कोची टस्कर्स केरळविरुद्ध कायदेशीर लढाई सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अलीकडेच कोची टस्कर्सने ८५० कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईचा दावा केला आहे.
एसजीएममध्ये एका अन्य निर्णयामध्ये राजस्थान क्रिकेट संघटनेचे (आरसीए) निलंबन रद्द करण्यात येणार आहे.
पण त्यासाठी आयपीएलचे माजी प्रमुख ललित मोदीला आरसीए संचालनापासून
दूर ठेवण्याची
अट घालण्यात आली आहे.
बीसीसीआयने क्रिकेटपटूंच्या डोप चाचणीच्या मुद्यावर आपली भूमिका कायम ठेवताना नाडाला खेळाडूंची चाचणी घेण्याची कुठली गरज नसल्याचे म्हटले आहे. कारण बोर्ड वाडाच्या नियमांचे पालन करीत आहे.
दरम्यान, बोर्डाच्या एका वरिष्ठ पदाधिकाºयाने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले, की कमी मानांकन असलेल्या संघांविरुद्ध कमी मालिका खेळण्यात येईल. ‘भारतीय संघाचे मायदेशातील जास्तीत जास्त सामने तीन मोठ्या संघांसोबत होणार आहेत.’
याचा अर्थ चारच संघ एकमेकांविरुद्ध अधिक कसोटी सामने खेळतील असा आहे का, याबाबत बोलताना चौधरी यांनी तुम्हाला असे म्हणता येईल.
अफगाणिस्तान पहिली कसोटी भारतात खेळणार
बीसीसीआयने युद्धजन्य परिस्थितीला सामोरे जाणाºया अफगाणिस्तानचे स्वागत करताना पहिल्या कसोटी सामन्याचे यजमानपद भूषविण्यास सहमती दर्शविली आहे. पण आपल्या नव्या भविष्य दौरा कार्यक्रमात (एफटीपी) पाकिस्तानला विशेष महत्त्व दिलेले नाही. मायदेशात अनेक अडचणींना सामोरे जात असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वत:ला सिद्ध करणारा अफगाणिस्तान संघ २०१९-२०२० मध्ये भारताविरुद्ध आपला पहिला कसोटी सामना खेळेल. लढतीचा कार्यक्रम नंतर निश्चित करण्यात येईल. दुसºया बाजूचा विचार करता आमसभेच्या विशेष बैठकीमध्ये पाकिस्तानकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. पाकिस्तान भारताविरुद्ध द्विपक्षीय मालिकेची मागणी करीत आहे. दोन देशांमधील राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तान या संघांदरम्यान २०१२ पासून द्विपक्षीय मालिका खेळली गेलेली नाही. चौधरी यांनी सांगितले, ‘अफगाणिस्तान संघ आपला पहिला कसोटी सामना २०१९ मध्ये आॅस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार होता. पण भारत व अफगाणिस्तान यांचे ऐतिहासिक संबंध बघता आम्ही पहिल्या कसोटी सामन्याचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे.’
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे (एसीबी) अध्यक्ष आतिफ मशाल यांनी या निर्णयासाठी बीसीसीआयचे आभार व्यक्त केले आहे.
निर्णय कोचीच्या बाजूने गेला असून त्याविरुद्ध बीसीसीआयने वरच्या न्यायालयात धाव घेतली आहे. आम्ही या माजी फ्रॅन्चायझीसोबत न्यायालयाबाहेर प्रकरण मिटवण्याबाबत चर्चा केली होती. त्यानंतर आम्ही आपल्या कायदेतज्ज्ञांकडे हे प्रकरण सोपविले. आम्ही न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे.
- अमिताभ चौधरी
Web Title: Increase in number of matches, but cut in days; Announcement of future tour programs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.