मेलबोर्न : कोरोना व्हायरस महामारी संपल्यानंतर क्रिकेटमध्ये चेंडू स्विंग करण्यासाठी लाळेचा किंवा घामाचा वापर करावा का याविषयी चर्चा सुरू झाली आहे. चेंडू तयार करणाऱ्या कूकाबुरा कंपनीने कृत्रिम पदार्थाचा वापर करण्यास पुढाकार घेतला असताना आॅस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉर्न याने चेंडूला चकाकी आणण्यासाठी लाळ वापरण्याची गरज भासणार नाही, असा एका बाजूने वजनी असलेला चेंडू बनविण्याची सूचना केली आहे.
यामुळे पाटा खेळपट्टीवरदेखील वेगवान गोलंदाजांना चेंडू स्विंग करण्यास मदत मिळेल, असे वॉर्नचे मत आहे. ‘स्काय स्पोर्ट्स’च्या क्रिकेट पॉडकास्टमध्ये बोलताना वॉर्न म्हणाला, ‘नेहमी स्विंग होईल, असा एका बाजूने जड असलेला चेंडू बनविण्यास काय हरकत आहे! असा चेंडू टेप लावलेल्या टेनिस किंवा लॉन बॉलसारखा दिसेल.’ कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता क्रिकेटमध्ये यापुढे चेंडूवर लाळ किंवा घाम लावण्यास बंदी आणली जाईल, अशी चर्चा आहे. कूकाबुराने याला पर्याय म्हणून ‘स्पंज अप्लिकेटर’ बनविण्यास सुरुवात केली. एक महिन्यात हा पर्याय उपलब्ध होईल, असा कंपनीचा दावा आहे.
‘सध्याचे वेगवान गोलंदाज वकार युनुस किंवा वसीम अक्रम यांच्यासारखे चेंडू स्विंग करू इच्छितात का, हे माहिती नाही. मात्र माझ्या सूचनेनुसार एका बाजूने जड असलेले चेंडू पाटा खेळपट्टीवरदेखील स्विंग होऊ शकतील. क्रिकेटला लोकप्रिय करण्याची हा योग्य पद्धत असून चेंडू कुरतडण्याचे प्रकारदेखील होणार नाहीत. बदलत्या काळानुसार बॅटचे वजन कमी झाले आणि आकारही मोठा झाला; मात्र चेंडूत कुठलाही बदल झालेला नाही. माझ्या प्रस्तावामुळे बॅट आणि चेंडू यांच्यात संतुलन साधले जाईल,’असा विश्वास वॉर्नने व्यक्त केला आहे.
लाळेचा वापर सोडून द्यावा- लाबुशेन
सिडनी : कोरोनानंतर मैदानावर परतताना चेंडूवर लाळेचा वापर करणे सोडून देण्याची गोलंदाजांनी तयारी ठेवायला हवी. बदलत्या काळानुसार स्वत:मध्ये बदल आणावेच लागतील, असे मत आॅस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लाबुशेन याने व्यक्त केले. ‘आमचे लक्ष्य मैदानावर परतणे हेच असल्याने जे बदल होतील, ते स्वीकारून खेळाच्या हितासाठी स्वत:ला सज्ज करायला हवे,’ असे लाबुशेन म्हणाला.
Web Title: Increase the weight of the ball to one side; Proposed to avoid the use of saliva
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.