नवी दिल्ली : रवी शास्त्री हे युवा खेळाडूंचे मेंटॉर आहेत. त्यांच्यात खेळाडूंना प्रेरित करण्याची क्षमता अविश्वसनीय असल्याची प्रशंसा माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी केली आहे. राष्ट्रीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनीदेखील गावसकरांच्या सुरात सूर मिळविला.
एका वेबिनारमध्ये गावसकर म्हणाले, ‘रवी शास्त्री यांच्यासमवेत सरावाच्यावेळी १० ते १५ मिनिटांचा वेळ घालविल्यानंतर कळते की, शास्त्री यांच्यात युवा खेळाडूंमध्ये आत्मविश्वास जागविण्याची कमालीची क्षमता आहे. शास्त्री हे खेळाडूंच्या कौशल्यावर आणि क्षमतेवर विश्वास ठेवतात. ते खेळाडूंवर रागावतील, त्याचवेळी उत्कृष्ट बनण्यासाठी काय करायला हवे, हेदेखील समजावतील. भरत अरुण यांनीदेखील भारतीय संघात उत्कृष्ट वेगवान गोलंदाजांची फळी निर्माण केली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दमदार कामगिरी करणारा कोणताही युवा गोलंदाज भरत अरुण यांच्या मार्गदर्शनाचा आवर्जून उल्लेख करतो. सर्वच गोलंदाजांना अरुण यांनी आश्वस्त केले. युवा खेळाडूंना
यापेक्षा दुसरे काय हवे?’
यावेळी अरुण यांनी वेगवान गोलंदाजांवरील जबाबदारी व्यवस्थापन आणि वेगवान टी. नटराजन याच्या जखमेबाबत वक्तव्य केले. अरुण म्हणाले, ‘शारीरिक फिटनेस आणि कौशल्य परस्परपूरक बाबी आहेत. केवळ कौशल्यावर अधिक लक्ष दिल्यास जखमी होण्याचा धोका असतो. फिटनेसवर अधिक भर दिला तरी काहीतरी चुकीचे घडते. प्रत्येक गोलंदाजांकडे कौशल्य व फिटनेस सारख्या प्रमाणात असायला हवे.’ मागच्या ४० वर्षांपासून शास्त्री यांच्याशी मैत्री असलेले अरुण यांनी मुख्य कोच शास्त्री हे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूला अधिक उत्कृष्ट बनण्यास मार्गदर्शन करतात. ‘तुझ्यात मोठी क्षमता आहे,’ असे ते आवर्जून सांगत असतात, या शब्दांत शास्त्री यांचा गौरव केला.
Web Title: Incredible ability in Shastri to inspire players: Gavaskar
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.