हॅमिल्टन : न्यूझीलंडमधील दोन फलंदाजांनी अविश्वसनीय कामगिरी करून दाखवली. नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट संघाच्या फलंदाजांनी स्थानिक वन डे क्रिकेटमध्ये एका षटकात तब्बल 43 धावा चोपल्या, त्यात सहा षटकारांचाही समावेश होता. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील ही एका षटकातील सर्वोच्च धावसंख्या आहे. जो कार्टर आणि ब्रेट हॅम्टन या दोघांनी नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट संघाचे प्रतिनिधित्व करताना सेंट्रल डिस्ट्रिक्ट संघाच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. दक्षिण आफ्रिकेतील गोलंदाज विलेम ल्युडीक हा या दोघांच्य फटकेबाजीला बळी पडला. त्याने 9 षटकात 1 बाद 42 धावा दिल्या होत्या, परंतु अखेरच्या षटकार कार्टर व हॅम्टन यांनी 43 धावा चोपल्या. नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट संघाने 7 बाद 313 धावांचा डोंगर उभा केल्या. त्यात कार्टरच्या 66 चेंडूंत 102 धावा आणि हॅम्टनच्या 66 चेंडूंत 95 धावांचा समावेश होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका षटकात 6 षटकारांचा विक्रम आहे. वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या हर्षल गिब्सने 2007च्या विश्वचषक स्पर्धेत नेदरलँड्सच्या डॅन व्हॅन बुंगच्या एका षटकार सहा षटकार खेचले होते. त्यानंतर ट्वेंटी-20 विश्वचषक स्पर्धेत भारताच्या युवराज सिंगने इंग्लंच्या स्टुअर्ट ब्रॉडची अशीच धुलाई केली होती.