नवी दिल्ली : सध्या भारत अ आणि न्यूझीलंड अ (IND-A vs NZ-A) यांच्यामध्ये एकदिवसीय मालिकेचा थरार रंगला आहे. सध्या सुरू असलेल्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी करताना किवी संघाच्या फलंदाजांना घाम फोडला. चेन्नईच्या धरतीवर होत असलेल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाचा फिरकीपटू कुलदीप यादवने कमाल केली. न्यूझीलंड अ च्या संघाला सर्वबाद २१९ धावा करता आल्या. कुलदीप यादवने जॅकोब डफीला बाद करून किवी संघाला ऑलआउट केले. भारताकडून ऋषी धवन आणि कुलदीप यादव यांनी शानदार गोलंदाजी केली.
तत्पुर्वी, न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कुलदीप यादवने लोगन व्हॅन बीक पाठोपाठ जो वॉकरला बाद करून सलग दोन बळी पटकावले. यामुळे कुलदीपला सलग ३ बळी घेऊन हॅट्रिक घेण्याची संधी मिळाली. तिसऱ्या चेंडूवर जॅकोब डफीला बाद करून फिरकीपटू कुलदीपने हॅट्रिक घेतली. याआधी त्याने अंडर-१९ मध्ये देखील हॅट्रिक घेतली होती. १९ वर्षांखालील विश्वचषकात स्कॉटलंडविरुद्ध त्याने हॅट्रिक घेऊन सर्वांचे लक्ष वेधले होते. त्याने आतापर्यंत ४ वेळा हॅट्रिक घेऊन नवा विक्रम केला आहे.
भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक (४) बळी पटकावले तर, राहुल चहर (२), ऋषी धवन (२), उमरान मलिक आणि राज बावा यांनी प्रत्येकी १-१ बळी पटकावून न्यूझीलंडला २१९ धावांवर रोखले. शार्दुल ठाकूर आणि टिळक वर्मा यांना बळी घेण्यात अपयश आले. न्यूझीलंडकडून जो कार्टर (७२) आणि रचिन रवींद्र (६१) यांनी शानदार खेळी करून धावसंख्या २०० पार नेली. किवी संघाची सुरूवात धीम्या गतीने झाली होती, मात्र सलामीवीर रचिन रवींद्रने शानदार खेळी करून डाव सावरला. या दोन फलंदाजांव्यतिरिक्त कोणत्याच फलंदाजाला खेळपट्टीवर जास्त काळ टिकता आले नाही.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ -पृथ्वी शॉ, ऋतुराज गायकवाड, रजत पाटीदार, संजू सॅमसन (कर्णधार), टिळक वर्मा, ऋषी धवन, राज बावा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, राहुल चहर, उमरान मलिक.
आजच्या सामन्यासाठी न्यूझीलंडचा संघ -रचिन रवींद्र, चाड बोवेस, टॉम ब्रुस, जो कार्टर, रॉबर्ट ओ डोनेल (कर्णधार), मायकेल रिप्पन, डेन क्लीव्हर, लोगान व्हॅन बीक, जो वॉकर, जॅकोब डफी, शॉन सोलिया.