IND A vs PAK A ACC Men's Emerging Cup : भारत-पाकिस्तान यांच्यातल्या इमर्जिंग आशिया चषक स्पर्धेत राजवर्धन हंगर्गेकर ( Rajvardhan Hangargekar ) चमकला. महाराष्ट्राच्या या गोलंदाजाने पाच विकेट्स घेत पाकिस्तानला गुडघे टेकण्यास भाग पाडले. भारत अ आणि पाकिस्तान अ यांच्यात कोलंबो येथे लढत सुरू आहे. पाकिस्तान अ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हंगर्गेकरने ८-१-४२-५ अशी अप्रितम स्पेल टाकून पाकिस्तानचा संपूर्ण संघ ४८ षटकांत २०५ धावांत माघारी पाठवला.
भारतीय संघाने सलग दोन विजय मिळवून आधीच उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले आहे. सईम आयूब आणि साहिबजादा फरहान यांनी पाकिस्तानच्या डावाची सुरूवात केली. राजवर्धनने चौथ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर आयूबला ( ०) यष्टिरक्षक ध्रुव जुरेलच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. त्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर ओमेर युसूफ ( ०) यालाही जुरेलकरवी झेलबाद करून माघारी पाठवले. फरहान व हसीबुल्लाह खान यांनी पाकिस्तानचा डाव सावरला, परंतु रियान परागने महत्त्वाची विकेट घेतली. फरहान ( ३५) धावांवर झेलबाद झाला. मानव सुतारने त्याच्या तिसऱ्या षटकात कामरान घुलाम ( १५) ची आणि खान ( २७) यांची विकेट मिळवली आणि पाकिस्तानची अवस्था ५ बाद ७८ अशी केली.