IND beat SA 1st Test: भारतीय संघानं सेंच्युरियनवर गुरुवारी इतिहास घडवला. सेंच्युरियनवरील हा भारताचाच नव्हे तर आशियाई देशातील संघाचा पहिलाच विजय ठरला. भारतानं या विजयासह ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात रिषभ पंतनं १०० बळी टिपण्याचा पराक्रम नावावर केला, मोहम्मद शमीनं कसोटीतील २०० विकेट्सही या सामन्यातून पूर्ण केल्या. त्यामुळे खेळाडूंनीही विजयाच्या दणक्यात सेलिब्रेशन केलं. कर्णधार विराट कोहली, आर अश्विन, चेतेश्वर पुजारा, मयांक अग्रवाल व मोहम्मद सिराज यांनी आफ्रिकेचा पारंपरिक 'Zulu' डान्स केला. हॉटेल स्टाफसोबतचा भारतीय खेळाडूंचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
लोकेश राहुल ( १२३), मयांक अग्रवाल ( ६०), अजिंक्य रहाणे ( ४८) व विराट ( ३५) यांच्या खेळीच्या जोरावर भारतानं पहिल्या डावात ३२७ धावा उभ्या केल्या. लुंगी एनगिडीनं ६, तर कागिसो रबाडानं ३ विकेट्स घेतल्या. पावसामुळे कसोटीचा एक दिवस वाया गेला. प्रत्युत्तरात आफ्रिकेकडून टेंबा बवुमा ( ५२) वगळता अन्य फलंदाज अपयशी ठरले अन् त्यांचा पहिला डाव १९७ धावांवर गुंडाळला. मोहम्मद शमीनं पाच विकेट्स घेतल्या.
भारतानं दुसऱ्या डावात १७४ धावाच केल्या. रबाडा व मार्को जॅन्सेन यांनी प्रत्येकी ४ विकेट्स घेतल्या. भारतानं ठेवलेल्या ३०५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार डीन एल्गरनं ( ७७) संघर्ष केला, परंतु तो बाद होताच आफ्रिकेचा डाव १९१ धावांवर गडगडला. जसप्रीत बुमराह व शमी यांनी प्रत्येकी ३ , तर मोहम्मद सिराज व आर अश्विन यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.