19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील आजच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय गोलंदाजांपुढे पाकिस्तानच्या फलंदाजांनी लोटांगण घातल्याचे पाहायला मिळाले. पाकिस्तानचे आठ फलंदाज भारतीय गोलंदाजांपुढे नतमस्तक झाल्याचे यावेळी पाहायला मिळाले.
पाकिस्तानचा सलामीवीर हैदर अली आणि कर्णधार रोहैल नाझीर यांची अर्धशतकी खेळी वगळता पाकच्या अन्य फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर शरणागती पत्करली. त्यामुळे पाकला जेमतेम 172 धावा करता आल्या.
पाकिस्तान संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी पहिल्या दहा षटकातं सुरेख गोलंदाजी करताना पाकच्या दोन फलंदाजांना माघारी पाठवले. मोहम्मद हुरैरा ( 4) दुसऱ्याच षटकात सुशांत मिश्राच्या गोलंदाजीवर माघारी परतला. त्यानंतर हैदर अली आणि फहाद मुनीर यांनी संयमी खेळ केला. पण, मुनीर 16 चेंडू खेळूनही एकही धाव करू शकला नाही. रवी बिश्नोईनं ९व्या षटकात त्याला अथर्व अंकोलेकरकरवी झेलबाद केले. पाकिस्तानला पहिल्या दहा षटकांत 2 बाद 36 धावाच करता आल्या.
त्यानंतर सलामीवीर हैदर अली आणि रोहैल नाझीर यांनी पाकिस्तानचा डाव सावरला. दोघांनी संयमी खेळ करताना संघाच्या धावांचा वेग हळुहळु वाढवला. हैदर अली आणि रोहैल नाझीर यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. 26व्या षटकात कर्णधार प्रियम गर्गनं चेंडू यशस्वी जैस्वालच्या हाती दिला. त्यानं हा विश्वास सार्थ ठरवताना हैदरला बाद करून पाकला मोठा धक्का दिला. हैदरनं 77 चेंडूंत 9 चौकारांसह 56 धावा केल्या. 28व्या षटकात पाकिस्ताननं शतकी पल्ला गाठला. 31व्या षटकात अथर्व आणि ध्रुव जुरेल यांनी कासीम अक्रम ( 9) याला धावबाद केले. रोहैल नाझीर एका बाजूनं खिंड लढवत होता, पण त्याला हवी तशी साथ मिळाली नाही. पाकिस्तानचे फलंदाज एकामागून माघारी परतत होते.
पाकिस्तानसाठी एका बाजूनं खिंड लढवणाऱ्या कर्णधार रोहैल नाझीरला 42 व्या षटकात सुशांत मिश्रानं माघारी पाठवले. रोहैलनं 62 धावा केल्या. भारताकडून सुशांतनं सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. कार्तिक त्यागी व रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. पाकिस्तानचा संपूर्ण संघ 43.1 षटकांत 172 धावांत माघारी परतला.
भारताच्या भेदक माऱ्यापुढे पाकिस्तानचे फलंदाज हतबल झाल्याचे पाहायला मिळाले. पाकिस्तानच्या आठ फलंदाजांना यावेळी दोन अंकी धावसंख्याही उभारता आली नाही. त्यामुळेच त्यांना प्रथम फलंदाजी करताना १७२ धावांवर समाधान मानावे लागले.