पाकिस्तान संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी पहिल्या दहा षटकातं सुरेख गोलंदाजी करताना पाकच्या दोन फलंदाजांना माघारी पाठवले. मोहम्मद हुरैरा ( 4) दुसऱ्याच षटकात सुशांत मिश्राच्या गोलंदाजीवर माघारी परतला. त्यानंतर हैदर अली आणि फहाद मुनीर यांनी संयमी खेळ केला. पण, मुनीर 16 चेंडू खेळूनही एकही धाव करू शकला नाही. रवी बिश्नोईनं ९व्या षटकात त्याला अथर्व अंकोलेकरकरवी झेलबाद केले. पाकिस्तानला पहिल्या दहा षटकांत 2 बाद 36 धावाच करता आल्या.
त्यानंतर सलामीवीर हैदर अली आणि रोहैल नाझीर यांनी पाकिस्तानचा डाव सावरला. दोघांनी संयमी खेळ करताना संघाच्या धावांचा वेग हळुहळु वाढवला. हैदर अली आणि रोहैल नाझीर यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. 26व्या षटकात कर्णधार प्रियम गर्गनं चेंडू यशस्वी जैस्वालच्या हाती दिला. त्यानं हा विश्वास सार्थ ठरवताना हैदरला बाद करून पाकला मोठा धक्का दिला. हैदरनं 77 चेंडूंत 9 चौकारांसह 56 धावा केल्या. 28व्या षटकात पाकिस्ताननं शतकी पल्ला गाठला. 31व्या षटकात अथर्व आणि ध्रुव जुरेल यांनी कासीम अक्रम ( 9) याला धावबाद केले. रोहैल नाझीर एका बाजूनं खिंड लढवत होता, पण त्याला हवी तशी साथ मिळाली नाही.
पण, या सामन्यात नाझीर आणि कासीम अक्रम यांचा पोपट झालेला पाहायला मिळाला. एक धाव घेण्याच्या नादात दोघांमधील ताळमेळ चुकला अन् दोघंनी एकाच एंडला जाऊन पोहोचले. मग काय भारताला आयती विकेट मिळाली.
पाहा व्हिडीओ..
काय सांगतोय दोन संघाचा 19 वर्षांखालील वर्ल्ड कपचा इतिहास
आतापर्यंत भारत आणि पाकिस्तान हे 19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत 9 वेळा समोरासमोर आले आहेत. पण, यात पाकिस्ताननं 5-4 असे वर्चस्व गाजवले आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात विजय मिळवून बरोबरी साधण्याचे आणि जेतेपद कायम राखण्याच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकण्याचा टीम इंडियाचा निर्धार आहे.
- 1988 - शाहिद अन्वर ( 43) आणि इंझमाम-उल-हक ( 39) यांच्या खेळीच्या जोरावर पाकिस्तान संघानं 7 बाद 194 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताचा डाव 39.3 षटकांत 126 धावांवर गडगडला. पाकिस्ताननं 68 धावांनी विजय मिळवला.
- 1998 - कर्णधार अमित पगणीसच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं 189 धावांचा यशस्वी पाठलाग केला. अमित भंडारी आणि रीतींदर सिंग सोढी यांनी गोलंदाजीत कमाल दाखवताना मिळून सात विकेट्स घेतल्या आणि पाकिस्तानचा डाव 188 धावांववर गुंडाळला. पगणीसं 38 धावा केल्या आणि मोहम्मद कैफनं अर्धशतकी खेळी केली.
- 2002 - सुपर लीगच्या त्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. भारताला 48.5 षटकांत 181 धावा करता आल्या, प्रत्युत्तरात पाकचा कर्णधार सलमान बटनं 85 धावांची नाबाद खेळी करून विजय निश्चित केला.
- 2004 - पाकिस्ताननं उपांत्य फेरीत भारताचा पराभव केला. टीम इंडियानं ठेवलेले 170 धावांचे लक्ष्य पाकिस्ताननं सहज पार केले. फवाद आलम आणि तारीक महमूद यांनी 88 धावांची विजयी भागीदारी केली.
- 2006 - चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांचा समावेश असलेल्या टीम इंडियाला पाकिस्ताननं पराभूत केलं होतं. पियुष चावलानं चार विकेट्स आणि जडेजानं तीन विकेट्स घेत पाकिस्तानचा डाव 109 धावांवर गुंडाळला होता. पण, भारताचे सहहा फलंदाज अवघ्या 3.2 षटकांत 9 धावांवर माघारी परतले होते. पियुष चावलानं 71 धावांची खेळी केली, परंतु पाकनं 38 धावांनी सामना जिंकला.
- 2010 - पुन्हा एकदा पाकिस्ताननं बाजी मारली. पावसाच्या व्यत्ययात खेळवल्या गेलेल्या त्या सामन्यात भारतानं 23 षटकांत 9 बाद 114 धावा केल्या. पाकिस्ताननं हा सामना दोन विकेट्स राखून जिंकला.
- 2012 - उन्मुक्त चंदचा नेतृत्वाखाली भारतीय संघानं विजय मिळवला. उपांत्य फेरीच्या लढतीत 137 धावांचा पाठलाग करताना भारतानं 8 धावांत तीन विकेट्स गमावल्या होत्या. बाबा अपराजीथनं अर्धशतक झळकावून भारताला 1 विकेट्स राखून विजय मिळवून दिला.
- 2014 - सर्फराज खान आणि संजू सॅमसन यांच्या अर्धशतकी खेळी करताना भारताला 262 धावांचा डोंगर उभारून दिला. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संपूर्ण संघ 222 धावाच करू शकला.
- 2018 - भारताने 2018 च्या 19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानला 203 धावांनी लोळवले होते.
Web Title: Ind U19 vs Pak U19, semi-final U19WC : Rohail Nazir and Qasim Akram end up at the same end and the latter has to make his way back to the pavilion
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.