चेन्नईच्या मैदानात रंगलेल्या बांगलादेश विरुद्धच्या कसोटी सामन्यात रिषभ पंतनं विक्रमी शतक झळकावले. जवळपास दोन वर्षांनी कसोटी संघात परतलेल्या रिषभ पंतनं शतकी खेळीसह महेंद्रसिंह धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. रिषभ पंतचं कसोटी कारकिर्दीतील हे सहावे शतक आहे. तो आता भारताकडून सर्वाधिक कसोटी शतक झळकवणाऱ्या विकेट किपरच्या यादीत धोनीसह संयुक्त रित्या अव्वलस्थानावर आहे.
पंतनं सुसाट वेगानं गाठला खास पल्ला रिषभ पंत याने ५८ व्या डावात महेंद्रसिंह धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. धोनीनं आपल्या कसोटी कारकिर्दीत विकेट किपर बॅटरच्या रुपात १४४ डावात ६ शतके झळकावली होती. पंत आता त्याचा हा विक्रम मागे टाकण्याच्या वाटेवर आहे. यासाठी त्याला फक्त एक शतक करावे लागेल. भारताकडून विकेट किपर बॅटरच्या रुपात सर्वाधिक कसोटी शतके झळकवणाऱ्या आघाडीच्या फलंदाजांच्या यादीत वृद्धिमान साहाचीह समावेश होता. त्याने ५४ डावात १ शतके झळकावली आहेत.
१०९ धावांच्या खेळीत चौकार-षटकारांची बरसात
चेन्नई कसोटी सामन्यात आघाडीचे ३ फलंदाज स्वस्तात बाद झाल्यानंतर पंतनं शुबमन गिलसोबत मोठी भागीदारी करत टीम इंडियाला एकदम मजबूत स्थितीत आणले. पंत-गिल जोडीनं तिसऱ्या चौथ्या विकेटसाठी १६७ धावांची भागीदारी रचली. पंतने आपल्या कमबॅक कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात शतकी तोऱ्यासह जबरदस्त कमबॅक केले. हसन मिराझच्या गोलंदाजीवर झेलबाद होऊन परतण्याआधी पंतनं १२८ चेंडूत १३ चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीने १०९ धावांची खेळी केली.