भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारताला तब्बल ३१ वर्षांनी असा मानहानीकारक पराभव सहन करावा लागला. पण एवढा लाजीरवाणा पराभव भारताला का स्वीकारावा लागला, या प्रश्नाचे उत्तर भारताचा कर्णधार विराट कहलीने दिले आहे. तिसरा सामना संपल्यावर कोहलीने पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
ट्वेन्टी-२० मालिकेतील सव्याज वचपा न्यूझीलंडने वनडे मालिकेत काढल्याचे पाहायला मिळाले. न्यूझीलंडने भारताला तिसऱ्या वनडे सामन्यातही पराभूत करत ही मालिका ३-० अशी सहजपणे खिशात टाकली. न्यूझीलंडने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतावर पाच विकेट्स राखून विजय मिळवला.
भारताच्या २९८ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडने दमदार सुरुवात केली. न्यूझीलंडच्या मार्टिन गप्तिल आणि हेनरी निकोल्स यांनी १०२ धावांची सलामी दिली. गप्तिलने यावेळी ४६ चेंडूंत सहा चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ६६ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. निकोल्सने ९ चौकारांच्या जोरावर ८० धावा केल्या. पण हे दोघे बाद झाल्यावर मात्र न्यूझीलंडची सामन्यावरची पकड ढिली झाली. कारण मधल्या फळीतील केन विल्यमसन आणि फॉर्मात असलेल्या रॉस टेलर हे दोघेही मोठी खेळी साकारण्यात अपयशी ठरले. पण त्यानंतर कॉलिन ग्रँडहोमने अर्धशतक झळकावत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
ट्वेंटी-20 मालिकेतील अपयश विसरून न्यूझीलंड संघानं वन डे मालिकेत दमदार कमबॅक केले. त्यांनी जगातील सर्वोत्तम संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टीम इंडियावर निर्भेळ यश मिळवलं. न्यूझीलंडनं तीन सामन्यांची ही मालिका 3-0 अशी जिंकून भारताला व्हाईटवॉश दिला. भारतीय संघाला 31वर्षांनतर अशा लाजीरवाण्या पराभवाला सामोरे जावं लागलं.
टीम इंडियावर 31 वर्षांनी व्हाईटवॉश पत्करण्याची नामुष्की ओढावली. तीन किंवा त्यापेक्षा अधिक द्विदेशीय वन डे मालिकेत भारताला तिसऱ्यांदा व्हाईटवॉश पत्करावा लागला आहे. यापूर्वी 1983/84 आणि 1988/89 मध्ये वेस्ट इंडिजनं 5-0 असा विजय मिळवला होता. त्यानंतर आज न्यूझीलंडनं तीन सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाला 3-0 अशी हार मानण्यास भाग पाडले.
या पराभवाची कोहलीने मीमांसा केली आहे. कोहली या पराभवाबद्दल म्हणाला की, " ठराविक फरकाने विकेट्स मिळवण्यात आम्ही अपयशी ठरलो. त्याचबरोबर आमचे क्षेत्ररक्षणही चांगले झाले नाही. प्रत्येक सामन्यात तुम्हाला संधी मिळत असते. पण या संधीचे सोने केले तरच तुम्ही विजय मिळवू शकता. पण या मालिकेत संधी मिळूनही आम्ही त्याचे सोने करू शकले नाही. त्यामुळेच या मालिकेत विजयासाठी आम्ही लायक ठरलो नाही."