मोहाली: भारताने अफगाणिस्तानला नमवून विजयी सलामी दिली. मोहालीमध्ये भारताने अफगाणिस्तानचा सहा गडी राखून पराभव केला. शिवम दुबेच्या खेळीने भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने ४० चेंडूत ६० धावांची खेळी खेळली. याशिवाय दुबेने २ षटकात केवळ ९ धावा देऊन एक बळी घेतला. टीम इंडियाचा माजी अष्टपैलू सुरेश रैनानेही दुबेच्या गोलंदाजीचे कौतुक केले. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेतील पहिला सामना मोहालीत खेळवला गेला.
गुरुवारी झालेल्या सामन्यानंतर रैनाने सांगितले की, धोनीने दुबेला गोलंदाजी करताना पाहिले असेल तर तो खूप प्रभावित झाला असेल हे नक्की. शिवम दुबे आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या संघाचा भाग आहे. शिवम दुबेच्या खेळीचे कौतुक करताना रैनाने म्हटले, "माही भाईने तुला आज गोलंदाजी करताना पाहिले आहे, सीएसकेसाठी तुला या हंगामात तीन षटके फिक्स असतील."
रैना-दुबेचा भन्नाट संवाद
रैनाने मिश्किलपणे म्हणताच दुबेने देखील सूचक विधान केले. तो म्हणाला, "माही भाई, कृपया रैना भाई काय बोलतोय ते ऐक." दुबे आणि रैना दोघेही इंडियन प्रीमियर लीगमध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जचा भाग राहिले आहेत. दुबे आगामी मोसमातही चेन्नईकडून खेळताना दिसेल. मात्र, धोनीने या खेळाडूचा वापर आतापर्यंत केवळ फलंदाज म्हणून केला आहे. त्यामुळे आयपीएल २०२४ मध्ये शिवम दुबेला गोलंदाजीची संधी मिळू शकते असे रैनाने म्हटले.
२०२३ च्या आयपीएल मोसमात दुबेने १५८.३३ च्या स्ट्राईक रेटने ४१८ धावा केल्या. गोलंदाजीबद्दल भाष्य करायचे झाले तर, आयपीएल २०२३ मध्ये त्याने एकही षटक टाकले नाही. २०२२ च्या आयपीएल हंगामात त्याला दोन षटके टाकण्याची संधी मिळाली. एकूणच शिवम दुबेची संघात भूमिका अष्टपैलू खेळाडूची असली तरी त्याला गोलंदाजीत फारशी संधी मिळालेली नाही.
हार्दिक पांड्याचा पर्याय बनणार
दुखापतग्रस्त हार्दिक पंड्याच्या जागी शिवम दुबेचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. दुबेने पहिल्याच सामन्यात आपली क्षमता दाखवून दिली. तो फलंदाजीला आला तेव्हा भारताची धावसंख्या ३.५ षटकांत २८ धावा होती. मग त्याने डाव सांभाळला अन् भारताची विजयाकडे कूच केली. त्याने २ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ६० धावांची खेळी केली. शेवटी त्याने षटकार आणि चौकार लगावत भारताला विजय मिळवून दिला.
Web Title: IND vs AFG 1st t20 While praising Shivam Dube, Suresh Raina has a demand for Chennai Super Kings captain MS Dhoni for IPL 2024
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.