IND vs AFG 2nd T20 Match Live Updates In Marathi | इंदूर: अफगाणिस्तानने दिलेल्या १७३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला सुरूवातीलाच मोठा धक्का बसला. कर्णधार रोहित शर्मा सलग दुसऱ्या सामन्यात शून्यावर तंबूत परतला आहे. पहिल्या सामन्यातील पराभवाचा बदला घ्यायच्या इराद्याने आज अफगाणिस्तानचा संघ मैदानात उतरला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाहुण्या संघाने साजेशी कामगिरी केली. लहान मैदानाचा फायदा घेत अफगाणिस्तानच्या नवख्या फलंदाजांनी देखील भारतीय गोलंदाजांची डोकेदुखी वाढवली. अफगाणिस्तानकडून गुलबदिन नायबने सर्वाधिक ५७ धावा केल्या. घातक वाटणाऱ्या गुलबदीनला बाहेर पाठवण्यात अक्षर पटेलला यश आले. अखेर अफगाणिस्तानने निर्धारित २० षटकांत सर्वबाद १७२ धावा केल्या. त्यामुळे भारताला विजयासाठी आणि मालिका खिशात घालण्यासाठी १७३ धावांची आवश्यकता आहे.
पत्युत्तरात भारतीय कर्णधाराला आजही खाते उघडता आले नाही. सलामीच्या सामन्यात रोहित शर्माला शुबमन गिलच्या चुकीमुळे धावबाद व्हावे लागले होते. मात्र, आज फजलहक फारुकीच्या अप्रतिम चेंडूवर हिटमॅनचा त्रिफळा उडाला. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात असलेला रोहित फसला अन् त्याचा त्रिफळा उडाला.
एकिकडे यशस्वी जैस्वालने चांगली सुरूवात केली तर रोहितला पहिल्या चेंडूवर तंबूत परतावे लागले. जैस्वालने पहिल्याच चेंडूवर झंझावाती चौकार ठोकून भारताचे खाते उघडले.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, शिवम दुबे, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार. आजच्या सामन्यासाठी अफगाणिस्तानचा संघ -इब्राहिम झादरान (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज, अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झदरन, करीम जनात, गुलबदिन नायब, नूर अहमद, मुझीर उर रहमान, नवीन उल हक, फजलहक फारुकी.