IND vs AFG 3rd T20I ( Marathi News ) : भारतीय संघाने बुधवारी बंगळुरूत रोमहर्षक विजय मिळवला. अफगाणिस्तानने यजमान भारताचा चांगलाच घाम काढला होता, परंतु रोहित शर्माने मोक्याच्या क्षणाला हुकूमी एक्का काढला अन् दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये ३ चेंडूंत भारताने सामना जिंकला. रोहित शर्माचे शतक अन् रिंकू सिंगच्या स्फोटक खेळीने भारताला ४ बाद २२ वरून ४ बाद २१२ धावांपर्यंत पोहोचवले. रोहित व रिंकूने १९० धावांची विक्रमी भागीदारी केली. अफगाणिस्ताननेही पलटवार करताना ६ बाद २१२ धावा केल्या. त्यामुळे सुपर ओव्हरमध्ये सामना गेला आणि त्यातही १६-१६ अशी बरोबरी झाली. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये भारताने बाजी मारली.
पहिल्या सुपर ओव्हरच्या पाचव्या चेंडूनंतर रोहित स्वतः डग आऊटमध्ये गेला अन् रिंकू सिंगला पाठवले. पण, सामना बरोबरीत सुटल्याने तो दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये पुन्हा फलंदाजीला आला. काहींच्या मते नियमानुसार जर सुपर ओव्हरमध्ये एखादा फलंदाज बाद किंवा रिटायर्ट आऊट झाला असेल तर तो पुढील सुपर ओव्हरमध्ये येऊ शकत नाही. पण, रोहित फलंदाजीला आल्याने त्याच्यावर चिटींगचा आरोप होऊ लागला. तो रिटायर्ट हर्ट झालेला की रिटायर्ट आऊट हे स्पष्ट न झाल्याने हा वाद सुरू राहिला. अफगाणिस्तानच्या खेळाडूंनीही रोहितला पुन्हा फलंदाजीला येताना पाहून आश्चर्य व्यक्त केले होते. आयसीसीचा नियम काय सांगतो?
जर एखादा फलंदाज आधीच्या सुपर ओव्हरमध्ये बाद झाला असल्यास, तो पुढील सुपर ओव्हरमध्ये फलंदाजी करू शकत नाही.
त्यामुळे रोहितच्या येण्याने वाद निर्माण झाला आहे. अम्पायरही हे सांगू शकले नाहीत की तो रिटायर्ट हर्ट झालेला की रिटायर्ट आऊट... जर तो रिटायर्ट हर्ट झाला असेल तर त्याला रिटायर्ट नॉट आऊट ग्राह्य धरले जाईल आणि तो पुढील सुपर ओव्हरमध्ये खेळण्याच पात्र ठरेल. पण, तो रिटायर्ट आऊट असेल तर तो पुन्हा फलंदाजीला येऊ शकत नाही.
"रोहित शर्मा रिटायर्ट आऊट झाला होता, आणि तरीही तो दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये फलंदाजीसाठी आला होता. त्याला फलंदाजीला यायला नाही पाहिजे होते कारण तो रिटायर्ट आऊट झाला होता आणि रिटायर्ट हर्ट झाला नव्हता. मला वाटते की पंचांनी चूक केली,''असे पार्थिव पटेल म्हणाला.