नवी दिल्ली : सध्या आशिया चषकाचा थरार रंगला असून ही स्पर्धा आता मुख्य टप्प्यात येऊन पोहचली आहे. भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि श्रीलंका या 4 संघांनी सुपर-4 मध्ये प्रवेश मिळवला आहे. मात्र अफगाणिस्तान आणि भारत या संघांना सुपर-4 च्या सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. सुपर-4 मध्ये पराभव झालेले दोन्ही संघ आज आमनेसामने असणार आहेत. लक्षणीय बाब म्हणजे रोहित शर्माला आजच्या सामन्यात विश्रांती देण्यात आली असून के.एल राहुलची कर्णधारपदी वर्णी लागली आहे.
दरम्यान, अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले आहे. भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांनी सुपर-4 मधील सामने गमावले आहेत. त्यामुळे आजचा सामना केवळ औपचारिकता असणार आहे. पाकिस्तान आणि श्रीलंका या संघांनी प्रत्येकी 3-3 सामने जिंकून स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. लक्षणीय बाब म्हणजे भारत-अफगाणिस्तान दोन्ही संघांनी आपले सुरूवातीचे दोन्ही सामने जिंकून देखील त्यांना सुपर-4 पर्यंतच समाधान मानावे लागले.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ - के.एल राहुल (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, अर्शदीप सिंग.
भारतीय संघात आजच्या सामन्यासाठी रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली असून के.एल राहुलकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर दीपक चहर, अक्षर पटेल आणि दिनेश कार्तिक यांना आजच्या सामन्यासाठी संधी देण्यात आली आहे. तर रोहित शर्मासह हार्दिक पांड्या आणि युजवेंद्र चहल यांना विश्रांती देण्यात आली आहे.