Hardik Pandya Comeback Update : क्रिकेट विश्वात आताच्या घडीला प्रसिद्धीच्या झोतात असलेला हार्दिक पांड्या दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर आहे. पण, मागील काही दिवसांपासून पांड्या चर्चेत कायम आहे. वन डे विश्वचषकातील दुखापतीनंतर तो संघाबाहेर झाला. आगामी आयपीएल हंगामासाठी त्याची मुंबई इंडियन्सच्या संघात घरवापसी झाली आहे. तसेच मुंबईच्या फ्रँचायझीने हार्दिकवर कर्णधारपदाची जबाबदारी देखील सोपवली आहे. माहितीनुसार, पांड्या भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात जानेवारीपासून सुरू होणाऱ्या ट्वेंटी-२० मालिकेचा भाग असू शकतो. यासोबतच तो आयपीएल २०२४ मध्येही खेळणार आहे.
'टाइम्स ऑफ इंडिया' या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत हार्दिक पांड्या भारतीय संघाचे नेतृत्व करू शकतो. याआधी पांड्या दुखापतीमुळे पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे तो भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील मालिकेत खेळणार नसल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. यासोबतच तो आयपीएल २०२४ मधूनही बाहेर जाऊ शकतो, अशी चर्चा होती. पण ताज्या अपडेटनुसार तो लवकरच पुनरागमन करणार आहे.
हार्दिकची एन्ट्री अन् कर्णधारपद हार्दिक पांड्याने २०१५ मध्ये मुंबई इंडियन्समधून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्याने १२३ आयपीएल सामन्यांत २३०९ धावा केल्या आहेत आणि ५३ विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएल २०२४ च्या लिलावासाठी मुंबई इंडियन्सकडे १५.२५ कोटीच रक्कम शिल्लक होती आणि गुजरात हार्दिकला १५ कोटी देत होते. त्यामुळे मुंबईला हार्दिकला संघात घेण्यासाठी पैसे कमी पडले होते. त्यांनी १७.५ कोटींत खरेदी केलेल्या कॅमेरून ग्रीनला RCB सोबत ट्रेड करून पर्समधील रक्कम वाढवली अन् हार्दिकला मोठी रक्कम देऊन आपल्या ताफ्यात घेतले. खरं तर मुंबईच्या संघात येण्यापूर्वी हार्दिकने एक मोठी अट ठेवली होती ती म्हणजे कर्णधारपद.
दरम्यान, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सने आपल्या पदार्पणाच्या (२०२२) हंगामातच विक्रम नोंदवला. पांड्याच्या नेतृत्वातील गुजरातच्या संघाला पहिल्याच हंगामात किताब जिंकण्यात यश आलं. मात्र, हार्दिकच्या जाण्याने गुजरात टायटन्सला मोठा धक्का बसला. खरं तर गुजरातच्या संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंची मोठी फळी असून शुबमन गिल व्यतिरिक्त, केन विल्यमसन, मोहम्मद शमी, वृद्धिमान साहा, विजयशंकर, साई किशोर, राशिद खान, डेव्हिड मिलर हे नामांकित खेळाडू गुजरातच्या ताफ्यात आहेत. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने गुजरातच्या संघाची धुरा भारताचा स्टार फलंदाज शुबमन गिलच्या खांद्यावर सोपवली. गिलसह टायटन्सच्या सर्व खेळाडूंनी मागील दोन हंगामात चमकदार कामगिरी केली आहे. त्यांचे नेतृत्व करण्यात हार्दिक यशस्वी ठरला.