IND vs AFG, ICC ODI World Cup 2023 : भारतानेवन डे वर्ल्ड कप स्पर्धेत पहिल्या सामन्यात रवींद्र जडेजा, विराट कोहली व लोकेश राहुलच्या कृपेने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला. पण, शुबमन गिलच्या अनुपस्थितीत संधी मिळालेल्या इशान किशनला अपयश आले. कर्णधार रोहित शर्मा व श्रेयस अय्यर हेही खाते न उघडता तंबूत परतले. त्यामुळे आघाडीच्या फलंदाजांची चांगली कामगिरी ही भारतासाठी चिंतेची बाब बनली आहे. शुबमन डेंग्यूमुळे उद्याच्या किंवा कदाचित पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यालाही मुकण्याची शक्यता अधिक आहे. त्यात उद्या होणाऱ्या अफगाणिस्ताविरुद्धच्या लढतीसाठी सराव करताना रोहितला दुखापत झाल्याचे वृत्त समोर येत आहे.
सराव सत्रात इशान, सूर्यकुमार यादव आणि रोहित यांनी नेट्समध्ये बराच काळ फलंदाजी केली. चेन्नई येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात शून्यावर बाद झालेला इशान स्थानिक नेट गोलंदाजांचा सामना करताना अडखळत होता. सूर्यकुमारने काही आक्रमक फटके खेळले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध निराशाजनक खेळ करणारा श्रेयस अय्यर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याशी चर्चा करताना दिसला. चेन्नईतील रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर शुबमन बरा होत आहे, असे अपडेट्स फलंदाज प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी दिले.