Join us  

Ind Vs AFG: विराट आणि नवीनमधला वाद मिटला, मैदानात दिसली मैत्री, मग गंभीरने दिली अशी प्रतिक्रिया 

ICC CWC 2023, Ind Vs AFG: आयपीएलमध्ये विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यातील वाद गाजला होता. त्यामुळे आता वर्ल्डकपमध्येही विराट कोहली आणि नवीन यांच्यात जुगलबंदी रंगेल, असे वाटत होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 11:12 AM

Open in App

क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल भारत आणि अफगाणिस्तानमध्ये खेळवल्या गेलेल्या सामन्यात भारताने १५ षटके आणि ८ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. या सामन्यादरम्यान, एक असा प्रसंग दिसला ज्यामुळे क्रिकेटप्रेमीही अवाक् झाले. तो प्रसंग होता विराट कोहली आणि नवीन उल हकमध्ये दिसलेल्या मैत्रिपूर्ण संबंधांचा. आयपीएलमध्ये विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यातील वाद गाजला होता. त्यामुळे आता वर्ल्डकपमध्येही विराट कोहली आणि नवीन यांच्यात जुगलबंदी रंगेल, असे वाटत होते. मात्र दोन्ही खेळाडूंमध्ये मैत्रिपूर्ण व्यवहार पाहायला मिळाला. त्यानंतर या विषयावर गौतम गंभीरची प्रतिक्रियाही समोर आली आहे.

आयपीएल २०२३ दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनौ सुपरजायंट्स यांच्यात झालेल्या सामन्यावेळी विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यात वाद झाला होता. तसेच सामना संपल्यानंतर त्यांच्यातील वाद आणखीनच भडकला होता. नवीनने हस्तांदोलन करण्यासाठी आलेल्या विराट कोहलीचा हात झटकला होता. त्यानंतर लखनौचा प्रशिक्षक गौतम गंभीर यानेही या वादात उडी घेतली होती.

मात्र आता वर्ल्डकपमध्ये दोन्ही खेळाडू आमनेसामने आले तेव्हा आताही त्यांच्यात क्रिकेटच्या सर्वोच्च मंचावरही त्यांच्यात जुगलबंदी रंगेल, असा अंदाज वर्तवला जात होता. दुसऱ्या डावात विराट कोहली फलंदाजीस आला तेव्हा क्रिकेटप्रेमींकडून विराट विराट अशा घोषणा देऊन नवीनला चिडवण्यात येत होते. मात्र मैदानात विराट कोहली आणि नवीनमध्ये मैत्रिपूर्ण वातावरण दिसले. तसेच दोन्ही खेळाडू एकमेकांशी एकमेकांशी हस्तांदोलन करताना तसेच हास्यविनोद करताना दिसले. नवीन आणि विराट कोहलीमधील वाद मिटल्यानंतर आता गौतम गंभीरची प्रतिक्रियाही समोर आली आहे.

भारत आणि अफगाणिस्तानमधील सामन्याचं समालोचन करत असलेला गौतम गंभीर म्हणाला की, लढाई ही मैदानावर होते, मैदानाच्या बाहेर होत नाही. प्रत्येक खेळाडूला आपल्या संघाच्या विजयासाठी लढण्याचा हक्क आहे. मग तुम्ही कुठल्या देशाचे किंवा कुठल्या श्रेणीतील खेळाडू आहात हे महत्त्वाचे नसते. आम्ही आज एक चांगली गोष्ट पाहिली ती म्हणजे विराट आणि नवीन यांच्यातील वाद संपुष्टात आला आहे. मी प्रेक्षकांना एकच सांगू इच्छितो की, सोशल मीडियावर कुठल्याही खेळाडूला ट्रोल करणं किंवा चुकीच्या पद्धतीने टार्गेट करणं योग्य नाही. नवीन आयपीएलमध्ये पहिल्यांदाच खेळला होता. तो अफगाणिस्तानसाठी खेळत आहे ही मोठी बाब आहे.  

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपविराट कोहलीभारतीय क्रिकेट संघअफगाणिस्तान