India vs Australia 1st ODI Live : मोहम्मद शमीच्या वेगवान माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाने गुडघे टेकले. मजबूत स्थितीत वाटणाऱ्या ऑस्ट्रेलियाचे ३ फलंदाज शमीने ११ चेंडूत माघारी पाठवून भारताला सामन्यात कमबॅक करून दिले. कर्णधार हार्दिक पांड्याने योग्य वेळी योग्य बदल केले आणि गोलंदाजांनी त्याचा निर्णय सार्थ ठरवताना ऑस्ट्रेलियाला धक्के दिले. स्टीव्ह स्मिथ व मिचेल मार्श ही जोडी तुटल्यानंतर कांगारूंचा डाव गडगडला.
मोहम्मद शमीने ११ चेंडूंत ३ फलंदाजांना दाखवला घरचा रस्ता; कांगारूंची वाईट अवस्था, Video
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मोहम्मद सिराजने दुसऱ्याच षटकात ऑस्ट्रेलियाला धक्का देताना ट्रॅव्हिस हेडचा त्रिफळा उडवला. स्टीव्ह स्मिथ व मिचेल मार्श यांनी भारतीय गोलंदाजांची अडचण केली होती. १२व्या षटकात हार्दिक पांड्याने ही जोडी तोडली. यष्टिरक्षक लोकेश राहुलने सुरेख झेल टिपला. स्मिथ २२ धावांवर माघारी परतला अन् मार्शसोबत त्याची ७२ धावांची भागीदारीही संपुष्टात आली. मार्शने अर्धशतक पूर्ण करताना काही अप्रतिम षटकार खेचून संघाची धावसंख्या शतकपार नेली. मार्शचे फटके पाहून चाहते चिंतेत गेले होते आणि ही चिंता रवींद्र जडेजाने दूर केली. मार्श ६५ चेंडूंत १० चौकार व ५ षटकारांच्या मदतीने ८१ धावांवर सिराजकरवी झेलबाद झाला.
कुलदीप यादवने मार्नस लाबुशेन ( १५) ची विकेट घेतली, रवींद्र जडेजाने अफलातून झेल टिपला. कॅमेरून ग्रीन आणि जोश इंग्लिस यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु तेव्हाच हार्दिकने गोलंदाजीत बदल केला. मोहम्मद शमीला ३ षटकांत २ निर्धाव षटकं फेकून ८ धावा देताना ३ विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाची अवस्था वाईट केली. इंग्लिस ( २६) , कॅमेरून ग्रीन ( १२) आणि मार्कस स्टॉयनिस ( ५) या विकेट त्याने मिळवून दिल्या. रवींद्र जडेजाने ग्लेन मॅक्सवेलची ( ८) विकेट मिळवू दिली. त्यानंतर सिराजच्या गोलंदाजीवर सीन एबॉटचा ( ०) अफलातून झेल गिलने टिपला. सिराजने आणखी एक धक्का देताना ऑस्ट्रेलियाचा डाव १८८ धावांवर गुंडाळला.
भारताविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना भारतातील ऑस्ट्रेलियाची ही सर्वात निचांक कामगिरी ठरली. यापूर्वी २००७मध्ये वानखेडेवरच १९३ धावांवर कांगारू ऑलआऊट झाले होते.