ब्रिस्बेन, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात चार धावांनी पराभव स्वीकारावा लागला. पण भारताचा युवा गोलंदाज जसप्रीत बुमराने या सामन्यात एका विक्रमाला गवसणी घातली आहे.
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकली होती. भारताने ऑस्ट्रेलियाला फलंदाजीसाठी पाचारण केले होते. ऑस्ट्रेलियाने १७ षटकांमध्ये १५८ धावा केल्या होत्या. पण पावसामुळे डकवर्थ-लुईस नियमांनुसार भारतापुढे १७ षटकांत १७४ धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते. भारताने या आव्हानाचा पाठलाग करताना १६९ धावा केल्या, त्यामुळे त्यांना चार धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने या सामन्यात २४ चेंडूंत चार षटकारांच्या जोरावर ४६ धावा केल्या. मॅक्सवेलला बुमराने बाद करून यावेळी मोठे यश मिळवून दिले. मॅक्सवेलला बाद करत ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक बळी मिळवण्याचा विक्रम यावेळी बुमराने आपल्या नावावर केला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ट्वेन्टी-२० लढतीत बुमराने ११ बळी मिळवले आहेत. यापूर्वी हा विक्रम आर. अश्विनच्या (११ बळी ) नावावर होता.