IND vs AUS T20 2022 Live Match Scorecard - हार्दिक पांड्याने ( Hardik Pandya) मोहाली गाजवली... लोकेश राहुल ( KL Rahul) व सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) यांनी भारतासाठी मजबूत पाया रचल्यानंतर हार्दिकने वादळी खेळ केला. त्याने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा अक्षरशः पालापाचोळा केला. कॅमेरून ग्रीनने टाकलेल्या २०व्या षटकातील अखेरच्या तीन चेंडूंवर हार्दिकने टोलावलेले षटकार लाजवाब होते. पण, भारतीय फलंदाजांच्या मेहनतीवर गोलंदाज व क्षेत्ररक्षकांनी पाणी फिरवलेले पाहायला मिळतेय. ऑस्ट्रेलियाने १० षटकांत १ बाद १०९ धावा केल्या आहेत.
त्यानंतर सूर्याने सूत्र हाती घेतली, परंतु कॅमेरून ग्रीनने त्याला माघारी पाठवले. सूर्या २५ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह ४६ धावांवर माघारी परतला. अक्षर पटेल ( ६) व दिनेश कार्तिक ( ६) आज फार कमाल करू शकले नाही. हार्दिक पांड्याचे वादळ नंतर घोंगावले. हार्दिकने ऑस्ट्रेलियाच्या क्षेत्ररक्षकांना अक्षरशः छळले. हार्दिकने २५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. हार्दिकने आज मोहालीत वादळ आणताना भारताला ६ बाद २०८ धावांचा टप्पा गाठून दिला. त्याने २०व्या षटकात सलग तीन षटकार खेचले आणि ३० चेंडूंत ७ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ७१ धावा केल्या. २०१३मध्ये भारताने राजकोट येथे ऑसींविरुद्ध ४ बाद २०२ धावा केल्या होत्या.
कॅमेरून ग्रीन व आरोन फिंच यांनी ऑस्ट्रेलियाला आक्रमक सुरुवात करून दिली. भुवनेश्वर कुमार व उमेश यादव यांच्यावर या दोघांनी हल्लाबोल केला, पण रोहितने लगेच अक्षर पटेलला गोलंदाजीला आणले. त्याने विश्वास सार्थ ठरवताना फिंचला २२ ( १३ चेंडू) धावांवर बाद करून ऑसींना ३९ धावांवर पहिला धक्का दिला. स्टीव्ह स्मिथ व ग्रीन यांनी ऑसींची धावांचा वेग १०च्या सरासरीने कायम ठेवताना पॉवर प्लेमध्ये १ बाद ६० धावा केल्या. स्मिथला LBW करण्याची आयती संधी भारताने गमावली.. अम्पायरच्या निर्णयाविरोधात त्यांनी DRS घेतला असता तर ही विकेट सहज मिळाली असती. चहलने टाकलेल्या सातव्या षटकात ग्रीनने २ षटकार व १ चौकारासह १९ धावा कुटल्या. ४४ धावांवर ग्रीनचा झेल अक्षर पटेलकडून सुटला.
नवव्या षटकात लोकेश राहुलकडून स्मिथचा ( १८) झेल सुटला. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त प्रथमच सलामीला आलेल्या कॅमेरून ग्रीनने २६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले.