IND vs AUS T20 2022 Live Match Scorecard - भारताच्या २०८ धावांच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने दमदार खेळ केला. कर्णधार आरोन फिंच माघारी परतल्यनंतर कॅमेरून ग्रीन व स्टीव्ह स्मिथ यांनी १० च्या सरासरीने धावा करताना १० षटकांत १ बाद १०९ धावा उभ्या केल्या. पण, ४३ महिन्यांनी भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या उमेश यादवने ( Umesh Yadav) १२व्या षटकात दोन विकेट्स घेत सामना फिरवला. पण, कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) चर्चेत आला. तो लाइव्ह सामन्यात दिनेश कार्तिकवर ( Dinesh Karthik) खवळलेला दिसला. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हा सर्व प्रकार पाहत होते. ( India vs Australia Live Match Scoreboard)
कॅमेरून ग्रीन व आरोन फिंच यांनी ऑस्ट्रेलियाला आक्रमक सुरुवात करून दिली. भुवनेश्वर कुमार व उमेश यादव यांच्यावर या दोघांनी हल्लाबोल केला, पण रोहितने लगेच अक्षर पटेलला गोलंदाजीला आणले. त्याने विश्वास सार्थ ठरवताना फिंचला २२ ( १३ चेंडू) धावांवर बाद करून ऑसींना ३९ धावांवर पहिला धक्का दिला. स्टीव्ह स्मिथ व ग्रीन यांनी ऑसींची धावांचा वेग १०च्या सरासरीने कायम ठेवताना पॉवर प्लेमध्ये १ बाद ६० धावा केल्या. स्मिथला LBW करण्याची आयती संधी भारताने गमावली.. अम्पायरच्या निर्णयाविरोधात त्यांनी DRS घेतला असता तर ही विकेट सहज मिळाली असती. चहलने टाकलेल्या सातव्या षटकात ग्रीनने २ षटकार व १ चौकारासह १९ धावा कुटल्या. ४४ धावांवर ग्रीनचा झेल अक्षर पटेलकडून सुटला.
नवव्या षटकात लोकेश राहुलकडून स्मिथचा ( १८) झेल सुटला. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त प्रथमच सलामीला आलेल्या कॅमेरून ग्रीनने २६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. १० षटकात ऑस्ट्रेलियाने १ बाद १०९ धावा केल्या, परंतु ब्रेकनंतर अक्षर व उमेश यादव यांनी सामना फिरवला. अक्षरच्या गोलंदाजीवर ग्रीनने पुन्हा उत्तुंग फटका मारला अन् विराटने सुरेख झेल टिपला. ग्रीन ३० चेंडूंत ८ चौकार व ४ षटकारासह ६१ धावा करून बाद झाला. १२ व्या षटकात उमेश यादवने ( Umesh Yadav) ऑसींना दोन मोठे धक्के दिले. स्मिथ ३५ आणि मॅक्सवेल १ धावेवर बाद झाला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मैदानावरील अम्पायरने या दोघांना नाबाद दिले होते, परंतु DRS घेत भारताने हे निर्णय बदलण्यास भाग पाडले.
मॅक्सवेलचा झेल घेण्यासाठी कार्तिकने चेंडू खूप खाली येण्याची वाट पाहिली. त्यामुळे तिसऱ्या अम्पायरलाही तो झेल पात्र आहे का ते पाहावे लागले. त्यामुळे रोहित थोडा नाराज दिसला आणि तो कार्तिकला बडबडला. अर्थात हे सर्व खेळीमेळीतच घडत होते.