IND vs AUS T20 2022 Live Match Scorecard - २० महिन्यानंतर भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात ट्वेंटी-२० सामना होत आहे. वर्ल्ड कप विजेत्या ऑस्ट्रेलियाचा सामना करून भारतीय संघ आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप तयारी करण्याच्या दृष्टीने मैदानावर उतरणार आहे. आशिया चषक २०२२ मध्ये विराट कोहलीचा ( Virat Kohli) परतलेला फॉर्म हा सुखावणारा आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धही त्याची बॅट तळपेल अशी अपेक्षा आहे. कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) याच्याकडूनही चांगल्या खेळीची आशा आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत हाच संघ खेळणार असल्याने भारताच्या प्रत्येक खेळाडूच्या कामगिरीवर सर्वांचे बारीक लक्ष्य असणार आहे. पण, आजच्या सामन्यात रोहित व विराट यांना विक्रमांचा पाऊस पाडण्याची संधी आहे.
आशिया चषक २०२२ मध्ये विराटने अखेर अडीच वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या ७१व्या आंतरराष्ट्रीय शतकाची नोंद केली. आशिया चषक स्पर्धेत त्याने २७६ धावा केल्या. विराटने आणखी एक शतक झळकावल्यास तो रिकी पाँटिंग याच्या ७१आंतरराष्ट्रीय शतकांचा विक्रम मोडून पुढे निघून जाईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकाच्या विक्रमात सचिन तेंडुलकर १०० शतकांसह आघाडीवर आणि आता विराटला दुसऱ्या क्रमांकावर जाण्याची संधी आहे. विराटने २०७ धावा केल्यास तो भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत तो दुसऱ्या क्रमांकावर येईल.
रोहित शर्मने दोन षटकार खेचताच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्सचा विक्रम त्याच्या नावावर होईल. न्यूझीलंडच्या मार्टीन गुप्तीलने १७२ षटकार खेचले आहेत. दरम्यान आजचा सामना हा ७.३० वाजता नाही तर सायंकाळी ७ वाजता सुरू होणार आहे आणि ६.३० वाजता टॉस होईल.